
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
देशात एका बाजूला ७२ व्या स्वातंत्र्यदिनाचा आनंदोत्सव सुरू आहे. असे असतानाच रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर न्याय मागण्यासाठी काही जणांनी उपोषणे छेडली आहेत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात होणाऱ्या गैरकारभाराविरोधात तसेच एस.टी. महामंडळाने केलेल्या भरमसाठ भाडेवाडी विरोधात नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण केले.
नवनिर्मिती फाऊंडेशन उक्षीच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन कार्यालाच्या विरोधात उपोषण छेडले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालात नोकर भरती करा,कार्यालयात सीसीटिव्ही बसवा, सर्व अर्ज मोफत मिळावेत, सर्व परवान्यासाठी लागणाऱ्या शुल्काचे तक्ता उपप्रादेशिक परिवहन कार्यालाच्या भिंतीवर लावावा, एजंटकडून होणारी लूट थांबवावी अशा मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आले आहे. नवनिर्मिती फाऊंडेशनचे रमजान गोलंदाज यांच्यासह अन्य वाहनचालकही सहभागी झाले होते. एस.टी. च्या दरवाढीविरोधात देखील काही नागरिकांनी उपोषण छेडले. शहर वाहतूकीचे १० रुपयांचे तिकीट १५ रुपये आणि १२ रुपयांचे तिकीट २०रुपये केले आहे ते रद्द करावे, या मागणीसाठी संतोष मयेकर, कुमार शेट्ये,राजीव कीर, संजय मयेकर यांच्यासह अन्य नागरिक सहभागी झाले होते.



























































