मुंबईहून पुणे-नाशिक गाठा अवघ्या दोन तासांत, पाहा सुपरफास्ट ट्रेनचा पहिला फोटो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
memu-mumbai-nashik-pune

सामना प्रतिनिधी । ठाणे

मुंबई – पुणे आणि मुंबई – नाशिक या रेल्वेमार्गावर लोकल चालवण्याच्या प्रयत्नाला अपशय आले असले तरी रेल्वे प्रशासनाने हार मानली नसून आता या मार्गावर सेमी हायस्पीड रेल्वे चालवण्याची तयारी करण्यात आली आहे. या प्रयोग यशस्वी झाल्यास या मुंबईहून ही दोन्ही शहरं अवघ्या दोन तासांत गाठता येतील.

मुंबईहून पुणे, नाशिक या शहरांत दोन तासांहून कमी वेळात पोहोचता यावे यासाठी रेल्वे प्रशासनाने दिल्ली-वाराणसी या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत (ट्रेन 18) या सेमी हायस्पीड सारखी मेमू ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या मेमू रेल्वे पैकी एक रेल्वे गुरुवारी कळवा कारशेडमध्ये दाखल झाली आहे. सफेद आणि लाल रंगातील ही ट्रायल रनसाठी तयार आहे. लवकरच याची ट्रायल रन घेण्यात येईल. या सेमी हायस्पीड ट्रेनमुळे दोन शहरांतील प्रवासाचे अतंर 40 टक्क्यांनी कमी होते. तसेच या ट्रेनच्या रचनेमुळे प्रवासी वाहून नेण्याची क्षमता ही 9 टक्क्यांनी अधिक वाढते. या ट्रेनचा स्पीड 110-130 किमी प्रति तास इतका असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.

लवकरच या मेमू ट्रेनची ट्रायल रन घेण्यात येणार आहे. ही ट्रायल रन यशस्वी झाल्यास ही दोन शहरं मुंबईच्या अधिक जवळ येणार आहेत.