
अहमदपूर तालुक्यातील अंधोरी येथील धसवाडी तलावाच्या नाल्यात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या वडील व मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला.
अंधोरी येथील रज्जाक रफिक शेख (वय 45 वर्ष) व त्यांचा मुलगा शाहिद रज्जाक शेख (वय 12 वर्षे) हे दोघे दि. 20 जुलै रोजी दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान धसवाडी साठवण तलावाच्या वरच्या भागातील नदीत मासेमारी करण्यासाठी गेले होते. साठवण तलावाच्या क्षेत्रात मोठा पाऊस झाल्याने सदरील नदीस पूर येऊन वडील व त्यांचा मुलगा पुरामध्ये वाहून गेले. याबाबत किनगाव पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अंधोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक के.एन. चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गजानन अनसापूरे, पोलीस हवालदार मुरकुटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सय्यद करीत आहेत.




























































