
एका 60 वर्षांच्या पित्याने आणि त्याच्या 32 वर्षांच्या मुलाने एकमेकांवर गोळी झाडल्याची घटना अमेरिकेत घडली आहे. या गोळीबारात त्या दोघांचाही मृत्यू झाला आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील अलबामा येथे ही भीषण घटना घडली. केविन जेम्स कॉकर आणि निकोलस कॉकर अशी या पिता-पुत्राची नावं आहेत. या दोघांचंही कुत्र्यावरून जोरदार भांडण झालं होतं, त्याचीच परिणती या गोळीबारात झाली.
निकोलस याने दोन कुत्र्यांना ठार मारलं होतं. हे कुत्रे त्यांच्याच घरचे पाळीव कुत्रे होते. पिट बुल प्रजातीच्या या कुत्र्यांपैकी एका कुत्र्याने निकोलसच्या प्रेयसीवर हल्ला केला होता.
त्यामुळे चिडलेल्या निकोलसने त्या दोन्ही कुत्र्यांना ठार मारलं. पण, त्यापैकी एका कुत्र्यावर निकोलसचे वडील केविन याचा खूप जीव होता. त्याला निकोलसच्या या वागण्याचा संताप आला आणि त्याने मुलासोबत वाद घातला.
सुरुवातीला नुसता वाद झाला, मग त्याची परिणती कडाक्याच्या भांडणात झाली. त्यानंतर मुलाने हातात पिस्तुल घेतलं आणि ते घेऊन तो धमकावू लागला. ते पाहून केविनने आपलं पिस्तुल काढलं आणि मुलावर गोळी चालवली. केविनला गोळी चालवताना पाहून निकोलसनेही गोळी चालवली. दोघांनाही गोळ्या वर्मी लागल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
दुसरीकडे निकोलसच्या प्रेयसीने मात्र कुत्र्याच्या हल्ल्याचं कारण वादाचं मूळ नसल्याचं सांगितलं आहे. तिने केविन याच्यावर आरोप करून त्यानेच आपल्या मुलाला ठार मारलं आणि मग आत्महत्या केली, असं तिचं म्हणणं आहे.




























































