
सामना प्रतिनिधी । भोकरदन/पारध
प्रेम प्रकरणातून गरोदर राहिलेल्या मुलीचा जन्मदात्या पित्याने साडू आणि भाच्याच्या मदतीने खून केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील जाम गावात घडली. तरुणीचा खून करून प्रेत जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा-मेहंगाव रोडवर डोंगर भागात आणून टाकले. छाया समाधान डुकरे (20) असे या मृत मुलीचे नाव आहे. पायाने अपंग असलेल्या छाया डुकरे हिचा प्रेम संबंधातून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासातच खुनाचा छडा लावून चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा-मेहगाव रस्त्यावरील एका नाल्याच्या काठावर वीस वर्षीय तरुणीचा मृतदेह सोमवारी आढळून आला होता. तरुणीला निर्घृणपणे मारहाण करून दोरीने गळा आवळून खून करण्यात आला होता. याची माहिती मिळाल्यानंतर पारध पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर अवघ्या तीनच तासात खुनाचा छडा लावून चार आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी मुलीचे वडील समाधान नामदेव डुकरे (45,रा.जांब,ता.जि. बुलढाणा), मावसा महादू कचरू उगले (रा.रुईखेड मायंबा,ता.जि. बुलढाणा), मावसा आण्णा पुंजाजी लोखंडे (रा.सोनगीरी, ता.जाफराबाद,जि. जालना) आणि आत्याभाऊ रामधन उत्तम दळवी (रा.दिंडोरे नगर,असोदा, जि.जळगाव) यांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी हत्येची कबुली दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील येथील जे.के. कंपनीत काम करत असताना तरुणीचे तेथीलच एका तरुणासोबत प्रेमसंबध प्रस्थापित झाले व त्यातूनच तिला दिवस गेले. तिच्या पोटात दोन ते अडीच महिन्याचा गर्भ होता ही माहिती तिच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच आता आपली समाजात बदनामी होईल म्हणून या सर्वांनी तिला कायमस्वरूपी संपवण्याचा कट रचला. रविवारी आरोपींनी तिला खोटे बोलून मोटरसायकलवर बसवले व धावडा- मेहगाव रस्त्या दरम्यान रात्रीच्या सुमारास या निर्जनस्थळी नेऊन अमानुषपणे मारहाण केली तसेच गळा आवळून तिची हत्या केली. आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला असून तरुणीचे कोणासोबत प्रेमसंबंध होते, याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय व इतर पोलीस करत आहेत.
शवविच्छेदनास टाळाटाळ
सदर तरुणीचा मृतदेह सोमवारी रात्री प्रा.आरोग्य केंद्र वालसावंगी येथे ठेवण्यात आला होता. रात्र झाली म्हणून शवविच्छेदन करता येणार नाही, असे कारण सांगून टाळून दिले. मंगळवारी दुपारी 12 पर्यंत महिला डॉक्टर नसल्याने शवविच्छेदन करता येणार नाही असे सांगण्यात आले. मृत तरुणीचा मृतदेह तब्बल सोळा तास उलटून देखील शवविच्छेदनाविना वालसावंगी प्रा. आरोग्य केंद्रात पडून होता.






























































