फेसबुकवरुन परदेशी महिलेसोबतची मैत्री महागात पडली, लाखो रुपयांला गंडा

फेसबुकवर एका परदेशातील महिलेशी मैत्री करुन तिच्याशी चॅटींग करताना निर्माण झालेल्या ओळखीतून दापोलीतील एका 57 वर्षीय व्यक्तीची 11 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. दापोली पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनिल गजानन भावे, वय 57, रा.ज़ालगाव, दापोली या व्यक्तीने दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सुनिल भावे यांनी फेसबुकवरुन जेसिका नॅन्सी या महिलेशी मैत्री केली. तिच्यासोबत चॅटींग करताना त्यांची ओळख अधिक वाढली.

जेसिका नॅन्सी हिने आपण अमेरिकेची रहिवासी असून अमेरिकन सैन्यात असल्याचे सांगितले. सध्या अफगाणीस्थानात तिचे मिशन पूर्ण करण्यासाठी आलेली असून मिशन पूर्ण झाल्यानंतर हिंदूस्थानात येऊन राहणार असल्याचे तिने सांगितले. त्याचबरोबर जेसिका नॅन्सी हिने प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून सुनिल भावे यांच्याकडून पैशांची मागणी केली.

वेगवेगळ्या खात्यात तिने पैसे भरण्यास सांगितले. त्यानंतर सुनिल भावे यांनी वेगवेगळ्या खात्यात मिळून 11 लाख 60 हजार रुपये एवढी रक्कम भरली. त्यानंतर भावे यांना जेसिकाने आणखी रक्कम भरण्यास सांगितली. तेव्हा मात्र त्यांना संशय आला आणि त्यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

आपली प्रतिक्रिया द्या