
सकस आहाराला नाकारून आजची पिढी फास्ट फूडवर ताव मारण्याला पसंती देत आहे, पण फास्ट फूड शरीराला घातक ठरत असून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थांच्या आरोग्यावर त्याचा घातक परिणाम होत आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन अन्न व औषध प्रशासन विभागाने शाळा व महाविद्यालयांतील कॅण्टिंगमधून ‘फास्ट फूड हटाव’ मोहीम हाती घेतली आहे.
पूर्वी शाळांमध्ये सकस खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांना खायला दिले जायचे, पण आताच्या जमान्यात शाळा–कॉलेजच्या कॅण्टिंगमध्ये सकस पदार्थांची जागा पिझ्झा, बर्गर, फ्रँकी यासारख्या फास्ट फूडने घेतली आहे. असे फास्ट फूड खाल्ल्याने लहान वयातच बालकांमध्ये लठ्ठपणा येतो. यामुळे स्वास्थ्य बिघडते आणि मुले स्थूल बनतात. आजची मुले ही देशाचे भविष्य आहेत.
देशाचे भविष्य तंदुरुस्त आणि सुदृढ असले पाहिजे म्हणून राज्यातील शाळा–महाविद्यालयीन कॅण्टिंगमधून फास्ट फूड हटवून कॅण्टिंगमधून केवळ सकस खाद्यपदार्थच देण्यात यावेत अशी मोहीम हाती घेतल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत जनजागृती व्हावी यासाठी आज एफडीएने प्रिन्सिपल, शिक्षक, कॅण्टिंग चालक व पालकांची कार्यशाळा आयोजित केली होती त्यात 150 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी एफडीए आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, तसेच आहारतज्ञानी उरस्थितांना मार्गदर्शन करून आवश्यक सूचना दिल्या.
कॅण्टिनवाल्यांना सकस पदार्थांची यादी
शाळा–महाविद्यालयांतील कॅण्टिन चालकांना सकस खाद्यपदार्थांची लिस्ट देण्यात आली आहे. त्या लिस्टनुसार खाद्यपदार्थ देण्यास सांगण्यात आले आहे. पण तरी कोणी तसे केले नाही तर परिस्थितीनुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.