
खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात एफडीएने गेल्या तीन दिवसांत धडक मोहीम राबविली. राज्यातल्या 20 जिल्ह्यांमधील कमी दर्जा किंवा असुरक्षित अन्नपदार्थ तसेच अस्वच्छ उत्पादन प्रक्रिया, दिशाभूल करणारे आवरण असल्याकारणास्तव 47 आस्थापनांवर एफडीएने छापेमारी केली. या कारवाईत 97 लाख 19 हजार 963 रुपये किमतीचा 84 हजार 335 किलो इतका अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे
29 ते 31 या तीन दिवसांच्या कालावधीत एफडीएच्या पथकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभरात विशेष मोहीम राबविली. अन्नपदार्थ तसेच भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थाची तपासणी करून अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत.
गुळामध्ये भेसळ
दौंड तालुक्यात तीन ठिकाणी गुळामध्ये साखरेची भेसळ होत असल्याचे आढळले. या ठिकाणी 10 लाख 66 हजारांचा गुळाचा तसेच भेसळीसाठी वापरण्यात येणाऱ्या साखरेचा 15 हजार 96 किलो इतका साठा जप्त केला.
32 आरोपींना अटक
एफडीएने 30 व 31 मे रोजी मुंबई, कोकण, पुणे, नाशिक व छत्रपती संभाजीनगर, अमरावती या विभागातील प्रतिबंधित गुटखा, पानमसाला विक्रेत्यांविरोधात केलेल्या कारवाईमध्ये 32 जणांना अटक केली आहे.


























































