
कष्टकरी आणि श्रमिकांसह विविध लहानमोठय़ा उद्योगधंद्यांचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या धारावीत मुंबईकरांच्या जिवाशी खेळ करण्याचा किळसवाणा प्रकार घडला आहे. गोदामात अस्वच्छता आणि बुरशीजन्य पदार्थ ठेवल्याप्रकरणी अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) झेप्टो या ऑनलाईन साहित्य पुरवणाऱ्या कंपनीचा परवाना निलंबित केला आहे. ही कंपनी मूळ किराणाकार्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचा भाग आहे.
अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम आणि सहआयुक्त (अन्न) मंगेश माने यांच्या निर्देशानुसार, अन्न सुरक्षा अधिकारी राम बोडके यांनी ही कारवाई केली आहे. कारवाईदरम्यान अन्नपदार्थांबाबत कमालीची अस्वच्छता आढळली. हे अन्नपदार्थ साचलेल्या आणि तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले होते, कोल्ड स्टोरेजचे तापमान नियमांनुसार राखले गेले नव्हते, काही अन्नपदार्थ तर जमिनीवरच टाकून ठेवलेले होते. मुदत संपलेले अन्नपदार्थ वेगळे करण्यात आले नसल्याचे आढळले.
गोदामावर पाळत ठेवून केली कारवाई
झेप्टोच्या गोदामात अन्नपदार्थांबद्दल योग्य ती काळजी घेतली जात असल्याची माहिती एफडीएच्या टीमला मिळाली. त्यानुसार धारावीतील झेप्टोच्या गोदामावर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी गोदामावर पाळत ठेवली. त्यानुसार गुप्त माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी आज छापा टाकला आणि प्रत्येक साहित्याची तपासणी केली. तपासात लोकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार उघड होताच एफडीएच्या टीमने झेप्टोचा परावाना निलंबित केला. दरम्यान, झेप्टोने या प्रकरणात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.