अभिप्राय – दृष्टिकोन बदलणारे विचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संध्या सिनकर

लेखक जेसन फ्राईड व डेव्हिड हॅन्सन यांची कंपनी वेब डिझाईनविषयी सल्ला देते आणि ऑनलाइन टूल्स छोटय़ा कंपन्यांना व बिझनेस ग्रुप्सना विकते. त्यांनी स्वतःची नफ्यात असणारी कंपनी मुद्दाम छोटी ठेवली आहे. व्यवसायाच्या दहाहून अधिक वर्षांत त्यांनी दोनदा आर्थिक मंदी, चलन फुगवटा, तेजी-मंदीचे अंदाज पाहिले आहेत. त्यांच्या स्वतःच्या व्यावसायिक अनुभवातून त्यांनी व्यवसाय सुरू करणे व तो भरभराटीला आणणे याविषयी सरळसोप्या शब्दांत सांगितलं आहे.

हे पुस्तक ज्यांनी व्यवसाय सुरू करण्याचा विचारही केला नाही, ज्यांचा व्यवसाय उत्तम सुरू आहे, जे लोक व्यवसायात पडायला घाबरतात, ज्यांना चाकोरीबद्ध काम करताना स्वतःचं काही करायचं आहे अशा सर्व लोकांना चांगलं मार्गदर्शन करतं. हल्ली तुम्ही रोजची नोकरी करत असताना आठवडय़ाला 10 ते 40 तास काम करून व्यवसाय सुरू करू शकता. काम करण्याची पद्धत बदलून काटकसरीने व्यवसाय केला तर पैसा मिळू शकतो. या पुस्तकात 12 प्रकरणे आहेत. त्यामध्ये व्यवसाय करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात, कोणत्या गोष्टींवर भर द्यावा हे विषद करून सांगितले आहे. प्रत्येक प्रकरणात उपयुक्त अशा गोष्टी नेमकेपणाने एक-दोन पानांत सांगितल्या आहेत. त्यांना दिलेले समर्पक हेडिंग आणि त्याबरोबरची छोटी चित्रे यामुळे ‘रिवर्क’ हे जेसन फ्राईड व डेव्हिड हॅन्सन यांनी लिहिलेले, अमृता देशपांडे यांनी अनुवाद केलेले पुस्तक देखणे झाले आहे. व्यवसायातील एकेका गोष्टीचा स्वतंत्रपणे विचार करून पारंपरिक गोष्टी का सोडून द्याव्यात हे त्यांनी सांगितले आहे.

चुकांमधून शिकणं या गोष्टीला फाजील महत्त्व मिळाले आहे. अपयशाला तुमच्या मार्गात येऊन देऊ नका. यश तुम्हाला खरी मदत करतं. जेव्हा यश मिळतं तेव्हा कोणती गोष्ट काम करते हे तुम्ही शिकता आणि ती पुढच्या वेळी अधिक उत्तम प्रकारे करू शकता.

प्रगती आणि व्यवसाय यांचं विस्तार हेच ध्येय असावे असं नाही. लहान असणं ही कायम मोठे होण्याच्या मार्गातील पायरी नाही. आपल्या व्यवसायासाठी योग्य मर्यादा शोधून आपण तिथे स्थिर राहू शकतो.

काहीतरी वेगळं, अर्थपूर्ण करा. उत्कृष्ट उत्पादन किंवा सेवा करण्याची सर्वात सोपी व सरळ पद्धत म्हणजे तुम्ही स्वतः जे वापराल ते तयार करणं. तुमची कल्पना तुम्ही चांगल्या प्रकारे अमलात आणा. तुमची सध्याची नोकरी-व्यवसाय सांभाळून थोडा वेळ तुमच्या कल्पनेवर काम करा. तुम्हाला नेमपं काय हवंय ते तुम्ही तुम्हाला हवं तसे डिझाईन करू शकता. तुमचा बिझनेस नवीन असतो तेव्हा काटकसर करायला हवी. अनेक मोठय़ा पंपन्यांची सुरुवात गॅरेजमध्ये झाली आहे.

तुम्ही करत असलेलं काम गरजेचं, महत्त्वाचं आहे का ते समजून घ्या. तुम्ही सोडवत असलेली समस्या काल्पनिक नाही ना? कधी कधी उत्साह व उपयुक्तता यांचा गोंधळ होतो. प्रत्येक वेळेस सोपा व योग्य मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. वाईट अनावश्यक कामावर वेळ घालवू नका. नाही म्हणायची सवय लावून घ्या. नम्रपणे नाही म्हणा. पंपनी लहान असताना तुम्ही कामाची दिशा बदलू शकता, ातात आणि कल्पना कायमस्वरूपी असतात. प्रेरणा जास्त काळ टिकत नाही. तुम्हाला एखादी गोष्ट करण्याची प्रेरणा मिळाली तर ती गोष्ट लगेच करा. जेव्हा तुम्ही प्रेरित असता तेव्हा दोन आठवडय़ाचे काम तुम्ही 24 तासांत करून टाकता.

व्यवसायातील छोटय़ा गोष्टींचा विचार करून आपले विचार व दृष्टिकोन कसे बदलायला हवेत हे लेखकांनी उदाहरणे देऊन सांगितले आहे. काम करण्याच्या पद्धतीत छोटे बदल करून, विचार व दृष्टिकोन बदलून तुम्ही व्यवसायात कसे यशस्वी होऊ शकता हे सांगणारे ‘रिवर्क’ हे अतिशय वाचनीय पुस्तक आहे.