
सामना ऑनलाईन,नांदेड
दै.प्रजावाणीचे संपादक सुधाकरराव डोईफोडे यांच्या नावाने राज्य शासनाने पुरस्कार जाहीर केला आहे. वृत्तपत्रातील उत्कृष्ट अग्रलेखासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. सोमवारी राज्य शासनाच्या वतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. रुपये ५१ हजार रोख व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
ज्येष्ठ पत्रकार सुधाकर डोईफोडे यांनी प्रजावाणीतील अग्रलेखामधून समाजातील अंधश्रध्दा व अनिष्ठ प्रथा यावर घणाघाती प्रहार केले. याशिवाय त्यांनी सामाजिक प्रबोधनही केले. त्यांना उत्कृष्ट अग्रलेखाबद्दलच्या पुरस्काराने तीन वर्षे सन्मानित करण्यात आले. वृत्तपत्रीय लेखनासोबत त्यांनी सामाजिक व साहित्यिक लिखाणही केले. ज्येष्ठ पत्रकार सुधाकर डोईफोडे यांच्या पत्रकारितेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे प्रजावाणीतील अग्रलेख. या अग्रलेखाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अनिष्ट प्रथा, अंधश्रध्दा यावर आसूड ओढले. मराठवाड्याच्या विकासाआड येणाऱ्या प्रवृत्तीवर त्यांनी शब्दबाण सोडले. गंपूनानाच्या माध्यमातून त्यांनी व्यंगात्मक टीका केली. या सर्व वैशिष्ट्यांमुळे सुधाकरराव डोईफोडे म्हणजे अग्रलेख अशी ओळख महाराष्ट्राला झाली.






















































