
एकीकडे अवकाळी पाऊस, तर दुसरीकडे पूरपरिस्थितीने हैराण झालेल्या शेतकऱयांसमोर आता नवे संकट उभे ठाकले आहे. ऐन रब्बी हंगाम तोंडावर असताना आता खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या स्वप्नांना पुन्हा सुरुंग लागला आहे.
पावसाळ्यात पाऊस वेळेवर झाला नाही म्हणून पिके वाया गेली. जी वाचली होती, ती शेवटच्या टप्प्यात जोरदार पावसाने वाया गेली. त्यामुळे शेतकरी त्यातून अद्याप सावरलेला नाही. हे कमी की काय म्हणून आता रब्बीतही खतांच्या किमतीत वाढ झाली आहे. जास्तीचे पैसे मोजून खते विकत घेण्याशिवाय आता शेतकऱयांसमोर पर्यायही राहिलेला नाही. युरिया व डीएपी खताचे भाव जरी वाढला नसले तरी रब्बीसाठी लागणाऱया खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात खताच्या किमती वाढल्याने त्याचा थेट परिणाम हिंदुस्थानातील बाजारपेठेवर झाल्याचे काही तज्ञांकडून सांगितले जाते. कोरोना काळात केंद्राने रासायनिक खतांच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेतला होता, पण लॉकडाऊनमध्ये शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱयांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. त्यामुळे शेतकऱयांनी या निर्णयाला विरोध केल्याने केंद्राने दरवाढ मागे घेतली होती. मात्र, पुन्हा खतांच्या किमती वाढल्या आहेत.
खत जुने दर नवे दर
डीएपी 1200 1200
युरिया 266 266
10.26.26 1300 1470
12.32.16 1300 1470
20.20.0.13 1150 1350
15.15.15 1250 1400

































































