मुंबईत उरली केवळ 70 ते 75 सिंगल स्क्रीन थिएटर्स, थिएटर मालक चिंतेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

सिंगल स्क्रीन थिएटरला गेल्या काही वर्षांपासून वाईट दिवस आले आहेत. पायरसी, ऑनलाइन चित्रपट पाहण्याची सुविधा, नवीन सिनेमे विविध चॅनेल्सवर रीलिज होणे इत्यादी कारणांमुळे या थिएटर्सकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. सध्या मुंबईत केवळ 70 ते 75 थिएटर्स उरली असून तीदेखील सध्या अखेरच्या घटता मोजत आहेत. राज्यभरात यापूर्वी 1100 ते 1200 थिएटर्स होती आता 465 थिएटर्स उरली आहेत, अशी माहिती सिंगल स्क्रीन थिएटर्स ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष नितीन दातार यांनी दिली.

सरकारचे सहकार्य नाही
सरकार पायरसी हटवण्यासाठी ठोस पावले उचलत नाही. तसेच जीएसटीमुळे कर कमी झाला असला तरीही इतर अनेक कर लादण्यात आले आहेत. त्यातून सवलत मिळत नाही. एखादा सिनेमा हिट गेलाच तर नफा केवळ सर्व्हिस प्रोव्हायडर आणि डिस्ट्रीब्युटरला होतो. सिंगल थिएटर्सना नफा मिळतच नाही. एका खेळाला हजारामागे केवळ 100 प्रेक्षक येतात. त्यामुळे इतर भाडी आणि नोकरदारांचे पगार काढायचे कसे, असा यक्षप्रश्न या थिएटर मालकांना पडलेला आहे. त्यामुळेच मुंबईसह राज्यभरातील अनेक थिएटर्स डबघाईला आल्याचे दातार यांनी सांगितले. दरम्यान, सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये एखादी भिंत घालून दोन स्क्रीन उपलब्ध करून देण्याची मागणी आम्ही सरकारकडे केली, परंतु त्यासाठीही सरकारने सहकार्य केले नाही असेही दातार यांनी सांगितले.

डिजिटल प्रोजेक्टर्सचे गणित
सध्या सर्वच थिएटर्समध्ये डिजिटल प्रोजेक्टर्स बसवण्यात आले आहेत.
सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये हे प्रोजेक्टर्स बसवण्याचा खर्च 3 लाखाच्या घरात आहे तर मल्टिप्लेक्ससाठी नऊ लाखांहून अधिक खर्च येतो.
या प्रोजेक्टर्ससाठी एका शोमागे 450 ते 500 भाडे आकारण्यात येते. एखाद्या चित्रपटाला गर्दी झाली नाही तर सिंगल स्क्रीन थिएटर्सचे नुकसान होते.
मल्टिप्लेक्स थिएटर्सना नुकसान होत नाही. कारण एखादी स्क्रीन बंद ठेवण्याचे पर्याय असतो, असेही दातार म्हणाले.
डिजिटल प्रोजेक्टर्स बसवल्यानंतर सरकार एका तिकिटामागे दोन ते चार रुपये देणार होते, परंतु ही योजना नंतर बारगळल्याचे ते म्हणाले.