
सामना ऑनलाईन । सेंट पीटस्बग
फिफा वर्ल्डकपमध्ये आपल्या दमदार कामगिरीने फुटबॉलशौकिनांची मने जिंकणाऱ्या बेल्जियमने तिसऱया स्थानासाठी झालेल्या लढतीत बलाढय़ इंग्लंडला २-० गोलफरकाने धूळ चारून स्पर्धेचा शेवट गोड केला. बेल्जियमकडून थॉमस म्युनियर व एडेन हॅजार्ड यांनी १-१ गोल केला.
पहिल्या मिनिटापासून आक्रमक झालेल्या बेल्जियमने लढतीच्या चौथ्याच मिनिटाला गोल केला. लोमेरू लुकाकाने खोलवर पासला टर्न करत चॅडलीला सुरेख पास दिला. चॅडलीने गोलपोस्टच्या दिशेने क्रॉस पास केला. चेंडूमागे वेगाने पळणाऱ्या थॉमस म्युनियरने घसरत किक मारून चेंडू जाळीत पाठवला. बेल्जियमने पूर्वार्धात १-० आघाडी कायम राखली. मध्यांतरानंतर इंग्लंडनेही बेल्जियमच्या गोलपोस्टवर हल्ले केले, मात्र बेल्जियमचा गोलरक्षक गोलपोस्टपुढे अभेद्य भिंतीप्रमाणे उभा राहिला. त्यानंतर ८२ व्या मिनिटाला एडेन हॅजार्डने सहज गोल करून बेल्जियमची आघाडी २-० अशी भक्कम केली अन् येथेच खऱ्या अर्थाने इंग्लंडने मॅच गमावली. अखेरच्या टप्प्यात इंग्लंडने गोलसाठी आटोकाट प्रयत्न केले, मात्र बचावात्मक पवित्रा घेतलेल्या बेल्जियमने इंग्लंडचे मनसुबे उधळून लावत विजयावर शिक्कामोर्तब केले. सहा गोलसह गोल्डन बूटच्या शर्यतीत असलेला इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनला अखेरच्या लढतीत एकही गोल करता आला नाही.





























































