नायजेरिया रेसमध्ये कायम; आईसलॅण्डवर २-०ने विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वोलगोग्रॅड

अहमद मुसाने केलेल्या दोन (४९ व ७५वे मिनिट) दमदार गोलमुळे नायजेरियाचे फिफा वर्ल्ड कपमधील आव्हान कायम आहे. सलामीच्या लढतीत क्रोएशियाकडून ०-२ अशा फरकाने पराभूत झालेल्या नायजेरियाने शुक्रवारी आईसलॅण्डला २-० असे हरवले आणि डी गटात महत्त्वपूर्ण गुण मिळवले. आता या गटात क्रोएशिया सहा गुणांसह अव्वल स्थानी असून नायजेरियाने तीन गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. आईसलॅण्ड व अर्जेंटिना यांनी प्रत्येकी एक गुण मिळवलाय.

…तर अर्जेंटिना पुढल्या फेरीत
क्रोएशियाकडून झालेल्या पराभवानंतर लियोनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाचा पाय खोलात गेलाय. त्यांच्यावर साखळीतच गारद होण्याची आपत्ती ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डी गटातील समीकरणांवर नजर टाकल्यास दुसऱ्या फेरीच्या लढतीनंतरही अर्जेंटिनाला बाद फेरीत पोहोचण्याची संधी असणार आहे.

असे झाल्यास प्रवेश पक्का

– अर्जेंटिनाने अखेरच्या लढतीत नायजेरियाला हरवल्यास तसेच क्रोएशियाने आईसलॅण्डला पराभूत केल्यास किंवा बरोबरीत रोखल्यास लियोनेल मेस्सीचा संघ पुढल्या फेरीत पोहचू शकतो.

– आईसलॅण्डने क्रोएशियाला हरवले तसेच अर्जेंटिनाने नायजेरियाला हरवले, तर याप्रसंगी दोन्ही संघांची गुणसंख्या समसमान चार होईल. यावेळी सरस गोलफरक असलेल्या संघाला आगेकूच करता येईल. एकूणच काय तर अर्जेंटिनाला आपला अखेरचा सामना जिंकावाच लागणार आहे.