
खिशातील पैसे पडले अशी बतावणी करत एका जि. प. शिक्षकाचे पन्नास हजार रुपये पळवून नेल्याची गुरुवारी बुलढाण्यातील मेहकरमध्ये घडली. तालुक्यातील जि. प. शाळा बोरी येथे कार्यरत व मेहकरच्या रामनगराचे रहिवासी गजानन विठ्ठलराव राजकर हे गुरुवारी स्टेट बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. पैसे घेऊन त्यांनी पन्नास हजार रुपये, दीड लाख रुपयांचा बाँड, एटीएम कार्ड व पासबुक असलेली बँग आपल्या दुचाकी प्लेजरच्या हँडडला लटकवली होती.
इंडेन गॅस एजन्सीसमोर पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघापैकी एकाने राजकर यांना तुमच्या खिशातील पैसे पडले असे सांगितले. राजकर यांनी गाडी उभी करून पैसे घेण्यासाठी पायी चालत गेले. याचा फायदा घेत दोघा दुचाकीस्वार अज्ञात चोरट्यांनी गाडीला लटकवलेली पन्नास हजाराची बॅग पळवली. ही घटना दुपारी पावने बाराच्या दरम्यान घडली. पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांना घटनेबाबत कळवण्यात आले. त्यांनी काही कर्मचारी पाठवून परीसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली. आजूबाजूला चौकशी केली. राजकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या घटनेनंतर पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी नागरिकांना जनतेने सावधानता बाळगावी असे आवाहन केले आहे. तसेच पोलीस असल्याचे सांगून फसवणे, अंगावर बिस्कीट टाकून फसवणे, एटीएम बंद होणार सांगून पैसे काढणे, पैसे पडले असे सांगून फसवणे, याबाबत सावधानता बाळगावी म्हणजे आपली फसवणूक होणार नाही, असे आवाहन करण्यात आले आहे.





























































