
भाजप हा देशाचे संविधान आणि लोकशाहीसाठी धोका आहे. भाजपच्या हुकूमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहे हे देशातील जनता पाहत आहे. वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून भाजपविरोधातील लढाई अहंकाराने नाही तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज व्यक्त केली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, सत्ता, पैसा आणि स्वायत्त संस्थाचा गैरवापर करून भारतीय जनता पक्षाने देशाच्या लोकशाही आणि संविधानाला संपवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. भाजपच्या या हुकूमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहेत भाजपची विभाजनवादी नीती, महागाई, बेरोजगारी, शेतकरीविरोधी धोरणे, सर्वसामान्यांचे प्रश्न यावर सातत्याने काँग्रेसनेच लढा दिला आहे.





























































