
राज्यात पहिलीपासून त्रिभाषा धोरण अभ्यासासाठी शासनाने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली आहे. मात्र त्रिभाषा धोरणाविरुद्धचा लढा तीव्र करण्याचा इशारा पालघरच्या मराठी वाचवू समितीने दिला आहे. हिंदीला प्राधान्य देऊन मातृभाषा आणि भाषिक संस्कृती नष्ट करण्याचे कटकारस्थान असल्याचा आरोप करत न्यावर आवाज उठवण्यासाठी समितीने पालघरमध्ये शनिवारी १ नोव्हेंबर रोजी मराठीकरण परिषदेचे आयोजन केले आहे.
नरेंद्र जाधव यांची समिती त्रिभाषा धोरणाच्या अनुषंगाने केवळ प्रश्नावलीच्या आधारे जनमानसांचा अंदाज घेत आहे. हे धोरणाला धरून नाही. केवळ प्रश्नावलीच्या आधारे हे धोरण कसे ठरवले जाऊ शकते, असा सवाल समितीमार्फत उपस्थित करण्यात आला आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये पहिलीपासून तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा कुठेही उल्लेख नाही आणि तशी शिफारसही नाही. राज्यात एकीकडे मराठी सक्ती पूर्णत्वास नसताना हिंदी विषयाची सक्ती करणे म्हणजे लहान मुलांचे शैक्षणिक हित, महाराष्ट्राची भाषिक-सांस्कृतिक ओळख पुसून टाकण्याचा हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे या प्रकाराला कडाडून विरोध करण्याच्या दृष्टिकोनातून मराठीकारण परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे. चुकीच्या पद्धतीने राबवण्यात येणाऱ्या धोरणाला आमचा विरोध असून शेवटपर्यंत भाषा वाचवण्यासाठी आम्ही लढत राहणार, असा ठाम निर्धार समितीने केला आहे.
संस्कृती टिकवण्यासाठी पुढाकार
भाषा, संस्कृती टिकवण्यासाठी मराठी वाचवू समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती समितीचे सुशील शेजुळे, जितेंद्र राऊळ, रमाकांत पाटील, पी. टी पाटील आणि छबीलदास गायकवाड यांनी दिली. या अनुषंगाने पालघर पूर्वेकडील गोविंद दादोबा ठाकूर सभागृहात १ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावेळी मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आणि कृती समन्वय समितीचे निमंत्रक डॉ. दीपक पवार, अभिनेत्री चिन्मयी सुमित, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. रमेश पानसे, शिक्षण अभ्यासक गिरीश सामंत यांचे मार्गदर्शन यावेळी होणार आहे.






























































