
गुटखा खाऊन घरासमोर थुंकू नका म्हटल्यामुळे पती-पत्नीसह मुलास हॉकीस्टीकने जबर मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री वडारवाडी परिसरात घडली. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश ओरसे (वय 39, रा. महालेनगर, वडारवाडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार तीन पुरूष व तीन महिला अशा सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घरासमोर बसले होते. त्यावेळी एकजण किराणा दुकानासमोर गुटखा खाऊन थुंकत होते. त्यावेळी राजेश यांच्या पत्नीने तरूणाला घरासमोर थुंकू नका, मला सहन होत नाही, असे म्हटले. त्याचा राग आल्यामुळे तीन महिलांसह एकूण सहा जणांनी राजेश यांच्या कुटुंबाला मारहाण केली. आरोपींनी राजेशची पत्नी, मुलगा यांना दांडके, हॉकीस्टीकने जबर मारहाण केली. भांडणात राजेश यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोनसाखळी पडून गहाळ झाली. घटनेची माहिती मिळताच चतुःश्रुंगी परोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी सहायक निरीक्षक दत्तात्रय शिंदे अधिक तपास करत आहेत.

























































