पॉड टॅक्सीवरून फडणवीस आणि शिंदेंमध्ये श्रेयासाठी लढाई, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या स्वतंत्र बैठका

वांद्रे-कुर्लादरम्यानच्या पॉड टॅक्सी प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसांपूर्वी बैठक घेतली होती. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पॉड टॅक्सी प्रकल्पाबाबत स्वतंत्र बैठक घेऊन प्रकल्पाला गती देण्याचे आदेश दिले. या दोन नेत्यांमध्ये समन्वय नसल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांना दोन स्वतंत्र बैठकांसाठी जुंपल्याची भावना अधिकाऱ्यांमध्ये आहे.

पॉड टॅक्सीच्या संदर्भात 22 सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित केली होती. पॉड टॅक्सी नागरिकांच्या सेवेत आणा असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले. परिवहन सेवेचे पुढचे पाऊल म्हणून पॉड टॅक्सी ही सेवा लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी नागरिकांच्या सेवेत आणावी असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी पॉड टॅक्सीबाबत पुन्हा एक स्वतंत्र बैठक घेतली. हा प्रकल्प देशातील एकमेव असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावा. तसेच या प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत दिले.

मुख्यमंत्र्यांनी पॉड टॅक्सीच्या संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीला एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता आणि आता एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या बैठकीला पुन्हा याच अधिकाऱ्यांना उपस्थिती लावावी लागली.

पॉड टॅक्सी योजनेचा फायदा

पॉड टॅक्सीसाठी वांद्रे ते कुर्ला या आठ किमी अंतरामध्ये 33 स्थानके आहेत. हा प्रकल्प सुरू झाल्यावर खासगी वाहनधारकांची संख्या कमी होण्यास मदत होईल आणि पर्यायाने रस्त्यावरची वाहतूकदेखील कमी होण्यास मदत होणार आहे.