
>> गजानन चेणगे
छत्रपती शाहू महाराजनगरी, सातारा, दि. 2 – ‘या देशाच्या भूत-भविष्याच्या विचाराला आरंभ होण्याआधी मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या गाभ्याला साहित्य संमेलनाने हात घातला आहे. मायमराठीच्या अस्तित्वाची लढाई आता आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. उद्या तुमच्या देव्हाऱ्यावर विठोबासमवेत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या प्रतिमा टिकाव्यात असे वाटत असेल तर वेळीच झोपेतून जागे व्हा, असे आवाहन 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले.
महाराष्ट्रातच मायमराठीचे अधःपतन होऊ नये याकरिता सर्व स्तरांवर प्रयत्न व्हावेत, अशा सूचना विश्वास पाटील यांनी केल्या. माफक दरात पुस्तक विक्रीच्या दुकानांना परवानगी द्यावी. ग्रंथालये, मराठी शाळा टिकविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे ते म्हणाले. ‘लेखक किंवा कवीला कोणतीही जात नसते, मात्र त्याला धर्म असतो. जो धर्म असतो तो फक्त मानवता धर्म! जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते तेव्हा तेव्हा गेल्या दोनशे वर्षांत सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. कवीच्या हृदयातून आलेले सच्चे शब्द प्रसंगी सत्तेच्या सिंहासनासमोर झुकत नाहीत, हे या भूमीतील साहित्यिकांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.’ असे पाटील म्हणाले.
‘लढाऊ धरतीमाता’ योजना सुरू करा
‘धान्य पिकवणाऱया प्रत्येक शेतकऱ्याच्या पत्नीचा व मातेचा गौरव व्हायला पाहिजे. त्यासाठी ‘लढाऊ धरतीमाता’ नावाची नवी योजना हाती घ्यावी, असे मत विश्वास पाटील यांनी मांडले. ‘लाडक्या बहिणीप्रमाणेच धान्य पिकवणाऱया प्रत्येक शेतकऱ्याच्या पत्नीचा व मातेचा गौरव व्हायला पाहिजे. एकीकडे त्या मतदान करण्यासाठी उपयोगी पडतीलच, पण त्याच वेळी जात शेतकऱयाची असल्यामुळे त्या अन्नधान्य पिकवण्याचा आपला मूळ धर्मसुद्धा अजिबात विसरू शकणार नाहीत, याची मला खात्री आहे. या योजनेच्या खर्चाने फारसा फरक पडणार नाही,’ असे पाटील म्हणाले.
नोकरी नाही म्हणून प्रत्येक खेडय़ात शेकडो मुले बिनलग्नाची आहेत. बेकारीत पोळणाऱ्या मुलाशी लग्न करण्याऐवजी डोक्यावर अक्षताच न पडलेल्या बऱ्या अशा विचाराने शेकडो मुलींचे विवाह लांबणीवर पडले आहेत. शेतीमालाला भाव नाही. ही भयानक शांतता आणि अस्वस्थता उद्याच्या भीषण भविष्याला आमंत्रण देणारी आहे हे बिलकुल विसरू नका, असे ही पाटील म्हणाले.
पाटील आणि कुलकर्णी एकत्र येतात, तेव्हा गावगाडा व्यवस्थित चालतो
जोशी आणि कुलकर्णी यांनी एकत्र येऊन अध्यक्ष पदासाठी पाटलांची निवड केली असे सांगत, पाटील आणि कुलकर्णी जेव्हा एकत्र येतात, तेव्हा गावगाडा व्यवस्थित चालतो अशी फटकेबाजी संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी अध्यक्षीय भाषणाच्या सुरुवातीलाच केली. त्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची असेल – मुख्यमंत्री
भाजपने रेटलेल्या हिंदी भाषा सक्तीच्या विषयावर चहुबाजूंनी उठलेल्या जनक्षोभामुळे या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट माघार घेतल्याचे आज पहायला मिळाले. साताऱ्यात भरलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात बोलताना त्यांनी, महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठीच सक्तीची असेल, इतर कुठलीही भाषा सक्तीची नाही, असा निर्वाळा त्यांनी दिला.
महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने मनोगत व्यक्त करताना प्रा. मिलिंद जोशी यांनी मायमराठीची अवहेलना होत असताना अन्य भाषांचे कोडकाwतुक नको, भाषेला विरोध नाही, परंतु सक्तीला विरोध आहे, अशी भूमिका मांडली होती. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी, महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीचीच राहील असे स्पष्ट केले. मराठी भाषा वगळता अन्य कुठल्याही भाषेची सक्ती नाही. स्वभाषेचा सन्मान नक्कीच व्हायला हवा. त्याच वेळी इतर भाषांचेही स्वागत व्हायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
समूह मनाचा आवाज बुलंद करा – डॉ. तारा भवाळकर
प्राथमिक स्तरावरील मुलांवर इतर भाषांचे ओझे, दडपण देऊ नये. मराठीव्यतिरिक्त इतर भाषांची सक्ती करणे अयोग्य आहे, असे मी मराठी भाषेची शिक्षिका असल्यामुळे अनुभवातून ठामपणे सांगत आहे, असा सल्ला संमेलनाच्या मावळत्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी या वेळी दिला. ग्रामीण, अर्ध ग्रामीण गावात नवीन मुले-मुली लिहिती झाली आहेत, तसेच नवीन प्रकाशक निर्माण होत आहेत, ही बाबही आश्वासक आहे. जेव्हा निरनिराळ्या जाती जमातीतील लोकं लिहायला लागतील तेव्हा त्यातील शब्द मराठी साहित्यात रुजतील आणि त्यातूनच मराठी भाषा समृद्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तपोवनावर कुऱ्हाडी चालणार नाहीत याची खबरदारी घ्या
गोदावरीकाठी असलेल्या तपोवनावर कुऱ्हाडी चालणार नाहीत याची खबरदारी घेतली पाहिजे, कारण प्रकृती टिकली तरच आपण टिकणार आहोत. आपल्याला जगायचे असेल तर झाडे, वने टिकायला हवीत, असे त्या म्हणाल्या.
बळीराजांच्या आत्महत्या हे सर्वांचे अपयश
एका गोष्टीचे मला खूप दुःख वाटते ते असे की, आमच्या पिढीतल्या साहित्यिकांनी जाणीवपूर्वक शेतकरी आत्महत्यांच्या दुष्ट पर्वामागच्या दुःखाची कारणमीमांसा आपल्या साहित्यातून सखोलपणे व्यक्त करायला हवी होती. बळीराजांच्या आत्महत्यांचे विषारी पर्व म्हणजे या भूमीतील सर्व राजकीय पक्षांचे, समाजाचे नव्हे तर आम्हा लेखक कलावंताचेसुद्धा अपयश आहे. गेल्या 44 वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागचे कारण शोधणे आणि त्याचे निवारण करणे हे कोणालाही जमलेले नाही. अन् खरे कारण म्हणजे काय, तर शेतकऱयाला शेतीचा धंदा करणेच परवडत नाही. म्हणून तो म्हणे मरणाला मिठी मारतो, अशा भावना विश्वास पाटील यांनी व्यक्त केल्या.

































































