
राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील रतनगढ शहराजवळ एक लढाऊ विमान कोसळले आहे. भानोदा गावाजवळ एक लढाऊ विमान कोसळल्याची माहिती आहे. पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. हे लढाऊ विमान हवाई दलाचे असल्याचे समजते.
वृत्तसंस्था एएनआयनुसार, हिंदुस्थानी वायुसेनेचे (आयएएफ) एक जग्वार लढाऊ विमान कोसळले आहे. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी लढाऊ विमानाचे अवशेष विखुरलेले आहेत. या घटनेनंतर लोकांची मोठी गर्दी जमली आहे. ही घटना दुपारी 1.25 वाजता भानोदा गावात घडली. राजलदेसर पोलिस स्टेशनचे अधिकारी कमलेश म्हणाले की, प्रथमदर्शनी हे विमान भारतीय वायुसेनेचे लढाऊ विमान असण्याची शक्यता आहे परंतु त्याची पुष्टी केली जात आहे.
एप्रिलच्या सुरुवातीला गुजरातमधील जामनगर जिल्ह्यात भारतीय वायुसेनेचे एक जग्वार लढाऊ विमान कोसळले. ही घटना जामनगरमधील सुवर्ण रोड गावाजवळ घडली, जिथे विमान कोसळल्यानंतर मोठी आग लागली. अपघातानंतर विमानाचे अनेक तुकडे झाले. 7 मार्च रोजी हरियाणाच्या अंबाला जिल्ह्यातही हवाई दलाचे एक लढाऊ विमान कोसळले होते. परंतु पायलट वेळेवर सुरक्षितपणे बाहेर पडला. लढाऊ विमान कोसळल्याने कोणताही मोठा अपघात झाला नाही.
चुरूचे एसपी जय यादव यांनी सांगितले की, राजलदेसर पोलिस स्टेशन परिसरातील भानुदा गावात विमान कोसळले. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. राजलदेसर पोलिसांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.