समाजमंदिरात बसल्याच्या कारणावरुन हाणामारी; ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूरमधील रेणापूर तालूक्यातील मौजे शेरा येथे मातंग समाजमंदिराच्या कट्ट्यावर बसण्याच्या कारणावरुन मारहाण करून दगडाने डोके फोडल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

या मारहाणप्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात रामराजा बालासाहेब कांबळे (रा. शेरा, ता. रेणापूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गावातील मातंग समाजाच्या समाज मंदिराच्या कट्ट्यावर आपण गोपीनाथ शिंदे, भागवत गोविंद भुरे बसले होते. त्यावेळी गावातील राम शिवाजी शिंपले हा तिथे आला आणि कट्ट्यावर का बसलास म्हणून आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केली. रस्त्यावरील दगड उचलून आपल्या दिशेने भिरकावला. त्यामुळे डोक्याला जखम झाली आहे. रेणापूर येथील शासकीय रुग्णालयात आपल्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर रेणापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीवरुन पोलिसांनी ॲट्रॉसिटी कायद्यानुसार राम शिवाजी शिंपले यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.