
FIH Men’s Junior World Cup 2025 मध्ये हिंदुस्थानच्या संघाला सेमी फायनलमध्ये जर्मनीकडून पराभव पत्करावा लागला आणि संघ फायनलमध्ये पोहचू शकला नाही. त्यामुळे तिसऱ्या स्थानासाठी आज (10 डिसेंबर 2025) टीम इंडिया आणि अर्जेंटिना यांच्यामध्ये रोमांचकारी सामना पार पडला. या अटीतटीच्या लढतीत टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक करत 4-2 अशा फरकाने सामना जिंकला आणि कांस्य पदकावर मोहोर उमटवली. यापूर्वी टीम इंडियाने 2016 साली लखनऊमध्ये पदक पटकावले होते.
टीम इंडिया आणि अर्जेंटिना यांच्यामध्ये खेळ सुरू झाला आणि अर्जेंटिनाने दमदार सुरुवात केली. पहिल्या तिन्ही क्वार्टरमध्ये अर्जेटिनाने टीम इंडियाला बॅकफुटवर ढकललं आणि 0-2 अशी आघाडी घेतली. मात्र, चौथ्या क्वार्टरमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी धुरळा उडवून दिला फक्त 10 मिनिटांत चार गोल मारले. अंकित पालने 48 व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर मनमीत सिंह (51 मिनीट), श्रद्धा नंद तिवारी (56 मिनिट) आणि अनमोल एक्का (57 मिनिट) यांनी लागोपाट गोल केल्यामुळे संघाचा विजय निश्चित झाला.
























































