FIR दाखल करा किंवा विशेषाधिकार प्रस्ताव आणा, मी घाबरणार नाही, राहुल गांधींनी केंद्र सरकारला ठणकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावरून (US Trade Deal) सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी सरकारला उघड आव्हान दिले आहे. “माझ्यावर एफआयआर (FIR) दाखल करा किंवा विशेषाधिकार प्रस्ताव आणा, मी तुमच्या धमक्यांना घाबरणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले आहे. X वर एक व्हिडीओ शेअर करत ते असे म्हणाले आहेत.

राहुल गांधींनी गेल्या काही दिवसांपासून या व्यापार करारातील अटींवरून प्रश्न उपस्थित केले असून, यामुळे देशातील बळीराजा आणि स्थानिक लघु उद्योजकांचे मोठे नुकसान होईल, असा दावा केला आहे. या आरोपांनंतर सत्ताधारी पक्षाकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली. मात्र या टीकेला प्रत्युत्तर देताना राहुल गांधी अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आवाज उठवण्यापासून त्यांना कोणतीही कारवाई रोखू शकत नाही.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, हिंदुस्थानच्या हिताशी तडजोड केली जात असताना मी शांत बसणार नाही. सरकारने या कराराबाबतची वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्याऐवजी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र कितीही गुन्हे दाखल झाले तरी मी सत्याचा मार्ग सोडणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.