
नववर्षाची पहिली पहाट आणि अॅशेस मालिकेचा अखेरचा अध्याय. इंग्लंडने 4 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरू होणाऱ्या पाचव्या व अंतिम कसोटीसाठी 12 सदस्यीय संघ जाहीर करत आपल्या आक्रमक मनसुब्यांचे संकेत दिले आहेत. मेलबर्नमध्ये मिळालेल्या धक्कादायक विजयानंतर इंग्लंड आता ही मालिका जरी जिंकता येणार नसली तरी वर्षाची सुरुवात मोठय़ा धमाक्याने करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
चौथ्या कसोटीतील संघात दोन बदल करत इंग्लंडने फिरकीवीर शोएब बशीर आणि वेगवान गोलंदाज मॅथ्यू पॉट्स यांना संघात स्थान दिले आहे. विशेष म्हणजे, अॅशेस मालिकेत प्रथमच इंग्लंडने तज्ञ फिरकीपटूला संघात स्थान दिले आहे. याआधी विल जॅक्स हाच एकमेव स्पिन पर्याय होता.
22 वर्षीय शोएब बशीरने हिंदुस्थानविरुद्ध 2024 मध्ये कसोटी पदार्पण केल्यानंतर आतापर्यंत 19 कसोटी सामन्यांत 68 विकेट घेतले आहेत. उसळत्या ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवर त्याची फिरकी इंग्लंडसाठी एक्स फॅक्टर ठरू शकते. दुसरीकडे, मॅथ्यू पॉट्स आपल्या शिस्तबद्ध वेगाने आणि सातत्याने फलंदाजांवर दबाव निर्माण करण्यासाठी ओळखला जातो.
मेलबर्नमध्ये विजयी संघाचा भाग असलेला गस अॅटकिंसन मात्र हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे बाहेर बसला आहे. ही इंग्लंडसाठी थोडी चिंता असली तरी स्टोक्सची टीम जोखीम घेण्याच्या मूडमध्ये आहे. दरम्यान, या कसोटीला आणखी भावनिक किनार लाभली आहे. अनुभवी ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजाने सिडनी कसोटीनंतर कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याची घोषणा केली आहे. त्याने 87 कसोटी, 6,206 धावा आणि 16 शतके ठोकली आहेत. ख्वाजासाठी हा सामना केवळ अॅशेसचा नव्हे, तर कारकीर्दीचा अखेरचा अध्याय असणार आहे. ऑस्ट्रेलियाने अॅशेस आधीच जिंकल्यामुळे ते सिडनीत फार मोठा धमाका करण्याचे त्यांचे मनसुबे नसल्याचे त्यांच्या देहबोलीतून जाणवतेय. त्यांनी आपला 15 सदस्यीय संघच जाहीर केल्यामुळे अंतिम अकरांमध्ये कोण असेल, ते कसोटीपूर्वीच कळेल.
मात्र इंग्लंडसाठी हा सामना नववर्षाचा सूर ठरवणारा आहे. ‘जिंकू किंवा इतिहास घडवू’ याच ध्येयाने स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंड सिडनीत हाच संदेश देण्याच्या तयारीत आहे.
n सिडनी कसोटीसाठी इंग्लंड संघ (12) ः बेन स्टोक्स (कर्णधार), शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, झॅक क्रॉली, बेन डकेट, विल जॅक्स, मॅथ्यू पॉट्स, जो रूट, जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), जोश टंग.
n ऑस्ट्रेलियाचा 15 सदस्यीय संघ ः उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, ट्रव्हिस हेड, पॅमरून ग्रीन, मिचेल मार्श, अॅलेक्स पॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, जॉश इंग्लिस, जेक वेदराल्ड, झाय रिचर्डसन, ब्रॅण्डन डॉगेट, टॉड मर्फी, मायकल नेसर, ब्यू बेवस्टर.































































