जगज्जेतेपदाचा फैसला आज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मॉस्को

रशियात ३२ संघांमध्ये रंगलेला फुटबॉल वर्ल्ड कपचा कुंभमेळा आता अखेरच्या टप्प्यात आलाय. आतापर्यंत झालेल्या ६३ लढतींत अनेक रथी-महारथी संघांना बॅगा भरून मायदेशाचा रस्ता धरावा लागला. आता स्पर्धेतील फेव्हरेट फ्रान्स आणि जाएंट किलर क्रोएशिया यांच्यामध्ये रविवारी फिफा वर्ल्ड कपच्या फायनलचे महायुद्ध रंगणार आहे. कागदावर फ्रान्सचा संघ सरस वाटत असला तरी अशा अनेक सरस संघांना धूळ चारून क्रोएशियाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे फ्रान्स दुसऱयांदा चॅम्पियन होणार की फुटबॉल जगताला क्रोएशियाच्या रूपाने नवा जगज्जेता मिळणार याचा फैसला आता काही तासांवर येऊन ठेपलाय.

युवा संघाला पसंती

फ्रान्सने गट फेरीत ऑस्ट्रेलिया व पेरू यांचा पराभव केला, तर डेन्मार्कशी त्यांना गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. मात्र त्यानंतर अर्जेंटिना, उरुग्वे व बेल्जियम या तगडय़ा संघांचा पराभव करून फ्रान्सने अंतिम फेरीत धडक दिली. नव्या दमाचा किलियन एम्बापे व अनुभवी एंटोइन ग्रिजमन यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर फ्रान्सने स्पर्धेत उत्तरोत्तर आपली कामगिरी उंचावत नेली. फ्रान्सने १९९८ च्या वर्ल्ड कपमध्ये उपांत्य लढतीत क्रोएशियाचा २-१ गोलफरकाने पराभव केला होता. आता यावेळीच्या अंतिम लढतीतही क्रोएशियाविरुद्ध फ्रान्सच्याच युवा संघाला विजयासाठी पसंती मिळत आहे.

माँड्रिचची सेना अखेरचा घाव घालणार

यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये सर्व लढती जिंकणारा क्रोएशिया हा एकमेव संघ होय. गट फेरीत नायजेरिया, अर्जेंटिना व आइसलॅण्ड या संघांचा पराभव केल्यानंतर क्रोएशियाने डेन्मार्क, रशिया आणि इंग्लंड या संघांना हरवून अनपेक्षितपणे अंतिम फेरीत प्रवेश केला. यात डेन्मार्क व रशियाचा, तर त्यांनी पेनल्टी शूटआऊटच्या थरारात पराभव केला. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य लढतीत पिछाडीवर पडल्यानंतरही क्रोएशियाने जबरदस्त पुनरागमन करून अतिरिक्त वेळेत विजयाला गवसणी घातली. कर्णधार लुका माँड्रिचने आपल्या संघात नवे स्फुल्लिंग चेतविले आहे. खूप घाम गाळत या संघाने फायनलपर्यंतचा प्रवास केला. मानसिकदृष्टय़ा कणखर बनलेला क्रोएशियाचा संघ आता अखेरचा घाव घालून इतिहास घडविणार काय याकडेच तमाम फुटबॉलशौकिनांचे लक्ष असेल.

वर्ल्ड कपची फायनल गाठणे म्हणजे स्वप्न उतरल्यासारखे होय. आता आम्ही किताबापासून केवळ एक पाऊल दूर आहोत.
– ब्लेसे माटुईडी
(मिडफिल्डर, फ्रान्स)

आम्ही खडतर प्रवास करून फायनल गाठलीय. आता जगज्जेते बनण्यासाठी अखेरची संधी असेल. याच प्रेरणेतून सर्वोत्तम कामगिरीत कुठलीच कसर सोडणार नाही.
– लॅटको डॅलिच
(प्रशिक्षक, क्रोएशिया)