
अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाऊ शकतात पण रद्द होऊ शकत नाहीत असे विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. परीक्षा न घेता पदव्या देण्याचा अधिकार राज्य सरकारांना नाही असेही यूजीसीच्या वतीने सांगण्यात आले. न्यायालयाने सर्व याचिकाकर्त्यांना त्यांचे म्हणणे लेखी स्वरुपात येत्या तीन दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले.
यूजीसीच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायमुर्ती अशोक भूषण, आर. सुभाष रेड्डी आणि एम. आर. शहा यांच्या खंडपीठासमोर व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे बाजू मांडली. यूजीसीच्या परीक्षेच्या सक्तीविरुध्द युवा सेनेबरोबरच विविध राज्य सरकारे आणि विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केल्या आहेत. आपात्कालीन व्यवस्थापन कायदा तसेच राज्य सरकारांच्या अधिकारांचा हवाला त्यात देण्यात आला आहे.
सॉलिसिटर जनरल मेहता यांनी खंडपीठाला सांगितले की, ‘परीक्षांसंदर्भात निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार हा केंद्र सरकारला असल्याचे सांगितले. लॉकडाऊन उठवल्यानंतर संपूर्ण देश पुन्हा कामाला लागला आहे. अंतिम वर्षाचे विद्यार्थी हे 21-22 वर्षे वयाचे आहेत. त्यांनी घराबाहेर पडू नये का? 30 सप्टेंबर ही डेडलाईन जबरदस्तीने नाही तर विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठीच देण्यात आली आहे. सर्व विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.’
विद्यार्थ्यांच्या वतीने ऍड. अलख श्रीवास्तव यांनी बाजू मांडताना सांगितले की, 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्याचा निर्णय हा योग्य विचारविमर्श केल्याशिवाय घेतला गेला आहे. परीक्षा घेतल्या न गेल्याने शिक्षणाच्या दर्जावर काहीच परिणाम होणार नसून आयआयटीसारख्या महत्वाच्या संस्थेनेही परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना पदवी देण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहितीही त्यांनी दिली. ऍड. अरविद दातार यांनीही विद्यार्थ्यांची बाजू मांडली. विद्यार्थ्यांचे कल्याण आणि सुरक्षा महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. यूजीसीने विद्यापीठांना त्यांचे स्वत:चे अभ्यासक्रम बनवण्यासाठी परवानगी दिलेली आहे, मग आता विद्यापीठांवर सक्ती का करत आहे असा युक्तीवाद त्यांनी केला.



























































