
आर्थिक फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार नवनवीन शक्कल लढवत असतात. आता नववर्षानिमित्त ‘हॅप्पी न्यू इयर एपीके’ फाईल पाठवून ते फसवणूक करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे अशी कुठलीही फाईल समाज माध्यमावर आल्यास ती उघडू नका, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
‘हॅप्पी न्यू इयर एपीके’ फाईलच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार नागरिकांना गंडा घालण्यासाठी सापळा रचत आहेत. कळत नकळत ती फाईल उघडल्यावर आपल्या बँक खात्यावर डल्ला पडेल. वेगवेगळ्या आकर्षक गिफ्टचे आमिष दाखवत किंवा नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी सायबर गुन्हेगार ‘हॅप्पी न्यू इयर एपीके’ फाईल समाज माध्यमावर पाठवत आहेत. तेव्हा वेळीच सावध व्हा अन्यथा सायबर गुन्हेगारांच्या सापळ्यात अडकून आर्थिक नुकसान करून घ्याल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. सायबर गुन्हेगारांचा वाढता धोका रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. त्याच पाश्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सोशल मिडीयातील विविध कारनाम्यांबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे.





























































