पत्नी एमएमआरडीएमध्ये उच्च पदावर कार्यरत आहे. तिच्या ओळखीने एमएमआरडीएमधून एक निवासी सदनिका आणि व्यावसायिक गाळा स्वस्तात मिळवून देतो, अशी बतावणी करीत एका भामट्याने डॉक्टरला 16 लाख 25 हजार रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डॉक्टरच्या तक्रारीवरून भांडुप पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदित्य वालावलकर (40) असे डॉक्टरचे नाव असून ते शहरातील विविध इस्पितळांमध्ये कन्सलटिंगचे काम करतात. भांडुप येथील एका इस्पितळात त्यांची नितीन साळवी याच्याशी भेट झाली होती. तेव्हा माझी पत्नी एमएमआरडीएमध्ये एचआर या उच्च पदावर कार्यरत आहे. तुम्ही काही पैशांची गुंतवणूक केल्यास मी पत्नीच्या मदतीने तुम्हाला एमएमआरडीएमधील निवासी सदनिका व व्यावसायिक गाळा स्वस्तात मिळवून देईन अशी बतावणी केली. नितीनच्या मिठ्ठासवाणीला भुलून आदित्य यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. मग नितीनने सांगितल्याप्रमाणे आदित्य यांनी 16 लाख 25 हजार रुपये नितीनला देऊ केले. पण पैसे मिळाल्यानंतर नितीनने आदित्य यांना टाळण्यास सुरुवात केली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आदित्य यांनी भांडुप पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आदित्य यांच्या तक्रारीवरून नितीन साळवी याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.