
आपल्याकडे आहारात लसूण हा हमखास वापरला जातो. लसूण हा आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. तुमच्या आहारात लसणाचा अनेक प्रकारे समावेश करू शकता. अर्ध्या पाकळीने सुरुवात करा आणि हळूहळू अख्ख्या पाकळीपर्यंत प्रमाण वाढवा. लसणाचा वास आणि चव तीव्र असल्यामुळे, तुम्ही त्याचे लहान तुकडे करूनही खाऊ शकता, ज्यामुळे ते खाण्यास सोपे जाते. तुम्ही ते मधात बुडवून कोमट पाण्यासोबतही खाऊ शकता.
सर्दी आणि खोकल्याच्या समस्येत आले आणि लसूण यांचे मिश्रण आपल्यासाठी उपयुक्त ठरते. आले आणि लसूण यांचा उष्ण प्रभाव असतो, तो खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते तसेच सर्दी आणि तापापासून खूप आराम मिळतो. आलं लसूण एकत्र खाल्ल्याने घसा खवखवणे कमी होण्यास मदत होते तसेच नाकातून पाणी येणे आणि सर्दी होणे यापासून आराम मिळतो.
बहुतेक हिंदुस्थानातील घरांमध्ये आलं आणि लसूण हे हमखास वापरले जातात. त्यात अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. आलं लसूण आहारात असल्याने, रक्ताभिसरणही वेगाने वाढते. आलं लसूण एकत्र खाल्ल्यामुळे केवळ रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. केवळ इतकेच नाही तर, हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही मोठ्या प्रमाणात कमी होतो. आले आणि लसूण एकत्र खाणे आपल्या हृदयासाठी सुद्धा फायदेशीर आहे. यामुळे वजन सहज कमी होते आणि कोलेस्टेरॉलची पातळी देखील कमी होते. यामुळे एथेरोस्क्लेरोसिसचा धोका कमी होतो. तसेच आपला रक्तदाब नियंत्रित राहतो, ज्यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो.
आले आणि लसूण एकत्र खाल्ल्याने कर्करोगाशी लढण्यास मदत होते. या मिश्रणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे कर्करोगाच्या पेशींना नुकसान पोहोचवून कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात.
आले आणि लसूणमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात; ते खाल्ल्याने हात आणि पाय दुखण्यापासून आराम मिळतो तसेच शरीरातील सूज दूर होते. आले आणि लसूणमध्ये आढळणारे गुणधर्म संधिवाताची लक्षणे कमी करण्यास देखील उपयुक्त ठरतात.




























































