
सामना ऑनलाईन, मुंबई
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आगीच्या घटनेनंतर बंद झालेली मोनोरेल गेल्या 1 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू झाली, परंतु अवघ्या 48 तासांत तांत्रिक बिघाडामुळे मोनोच्या काही सेवा रद्द कराव्या लागल्या. या बिघाडाला जबाबदार असलेल्या लार्सन ऍण्ड टुब्रो-स्कोमी इंजिनीयरिंग कंपनीला दंड ठोठावला जाणार आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एमएमआरडीए समिती नेमणार आहे.
मोनोरेल ही तोटय़ात असली तरी ती पुन्हा बंद करण्याच्या मनःस्थितीत एमएमआरडीए नाही. कारण मोनो पुन्हा सुरू करण्यासाठी लार्सन ऍण्ड टुब्रो-स्कोमी इंजिनीयरिंग कंपनीला एमएमआरडीएने ट्रीपचा दर वाढवून दिला. त्यानंतरही तांत्रिक बिघाड झाल्याने एमएमआरडीएने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, फेब्रुवारीपासून सुरू करण्याची योजना असलेला वडाळा ते जेकब सर्कल या दुसऱया टप्प्याचे भवितव्यही अधांतरीच राहण्याची शक्यता आहे.






























































