‘या’ देशात मिळणार आठवड्यात तीन दिवस सुटी; फक्त 6 तासांची असणार शिफ्ट!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी विविध देशात अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. जपानमध्ये कर्मचाऱ्यांनी जास्तीतजास्त वेळ कुटुंबीयांसोबत घालवावा, यासाठी काही योजना आखण्यात आल्या आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागल्यावर इतर देशांनीही अशाच योजना राबण्यास सुरुवात केली आहे. फिनलँडमध्ये आता चार दिवसांचा आठवडा करण्याचा प्रस्ताव आणण्यात आला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना आठवड्यातील फक्त चार दिवस काम करायचे असून तीन दिवस सुटी मिळणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या कामाची 8 तासांची वेळही कमी करण्यात येणार आहे. त्यांची कामाची वेळ फक्त 6 तासांची असेल.

फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन यांनी हा प्रस्ताव आणला आहे. सना मरीन 34 वर्षांच्या सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून नेहमी चर्चेत असतात. आता त्यांनी आणलेल्या या नव्या प्रस्तावामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांसाठी जास्तीतजास्त वेळ द्यावा आणि आपले छंद जोपासण्यासाठीही त्यांना वेळ मिळावा, यासाठी हा प्रस्ताव आणल्याचे सना मरीन यांनी सांगितले. फिनलँडमधून या प्रस्तावाचे स्वागत करण्यात आले आहे. मात्र, काही देशांकडून या प्रस्तावाचा विरोध करण्यात येत आहे. या प्रस्तावामुळे कर्मचाऱ्यांची काम करण्याची इच्छा कमी होईल, असे काही देशांचे म्हणणे आहे. आठवड्यातील फक्त चार दिवसच काम केल्याने काम करण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. आम्हालाही आठवड्यातील चार दिवस काम करायला आवडेल. मात्र, आमची इच्छा असूनही कामाच्या व्यापामुळे आम्हाला हे शक्य नसल्याचे ब्रिटनमधील लेखक डॅनियल हन्नान यांनी सांगितले.

नुकत्याच झालेल्या काही सर्वेक्षणातून कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास कमी केल्यास अधिक चांगले काम होते, असे दिसून आले आहे. गेल्या वर्षी जपानच्या मायक्रोसॉफ्टमध्ये चार दिवसांचा आठवडा करण्याची योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आली होती. त्यात कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील फक्त चार तास काम करूनही उत्पादकता 40 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. मेलबॉर्नमध्येही एका संस्थेने कामाचे तास 6 तासांचे करण्याबाबत सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात कामाचे तास कमी असल्याने कामाचा उरक करण्यावर कर्मचाऱ्यांचा भर असल्याचे दिसून आले. त्यात ई मेल पाठवणे, चॅटिंग करणे, विनाकारण बैठका घेणे, इंटनेटवर सर्फिंग करणे यासारख्या गोष्टी कमी झाल्याने कामाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले.
एलेक्ट्रा लाइटिंग, थिंक प्रो़डक्टिव्ह आणि पोर्टकुलिस लिगल्स यासारखे ब्रिटिश व्यावसायिक संस्थानी चार दिवसांचा आठवडा केला असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. फक्त चार दिवसांचा आठवडा करण्यात आल्याने आमच्या जीवनात आमुलाग्र बदल झाला असून आमची काम करण्याची क्षमता वाढल्याचे 77 टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले. स्वीडनमध्ये परिचारिकांसाठी कामाचे 6 तास करण्यात आल्यानंतर त्या आधीपेक्षा जास्त उत्साही, आनंदी आणि कार्यतत्पर झाल्याचे दिसून आले. त्यामुळे फिनलँडमध्ये आणलेल्या या प्रस्तावाचे स्वागत करण्यात येत आहे.