
सामना प्रतिनिधी । पाथर्डी
कानिफनाथांनी संजीवन समाधी घेतलेल्या पाथर्डी तालुक्यातील श्री. क्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व दोन जणांविरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. देवस्थानच्या एका विश्वस्तानेच हा गुन्हा दाखल केल्याने देवस्थानमधील अंतर्गत वाद चिघळला असल्याचे मानले जात आहे.
याबाबत देवस्थानचे विश्वस्त मधुकर साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 13 जून 2018 रोजी देवस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब मरकड, विश्वस्त सुधीर भाऊराव मरकड व माजी सरपंच देविदास विनायक मरकड यांनी जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली. दरम्यान, या गुन्ह्याचे तपासी अधिकारी मंदार जावळे यांनी मढी गावाला भेट देत या गुन्ह्याची माहिती घेतली आहे. दिवसेंदिवस मढी देवस्थानच्या विश्वस्तांमधील वाद विकोपाला जाऊ लागल्याने कानिफनाथांच्या भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला असून सध्याही काही विश्व्स्तानाची धर्मदाय आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीवरून देवस्थानच्या कारभाराची चौकशी चालू झालेली आहे.




























































