
सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ
सोमवारी सकाळी ५ च्या सुमारास शहरातील मोंढा परिसरात लागलेल्या आगीत चार दुकाने जळून खाक झाली आहेत. यामध्ये अंदाजे २५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. स्टेशन रोडवरील सरदारजी सायकल मार्टच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रिकच्या दुकानात सकाळी ही आग लागली होती. बघता बघता आग बाजूच्या दुकानात पसरली. आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. मात्र तोपर्यंत आग पसरली होती. नंतर परळी थर्मल पॉवर स्टेशन आणि वैद्यनाथ साखर कारखान्याचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्यावर आग आटोक्यात आली.
पण तोवर उशीर झाला होता तीन दुकानातील सर्व साहित्य जाळून खाक झाले होते. इलेक्ट्रिक दुकानात लागलेल्या आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.काही अनर्थ होऊ नये यासाठी परिसरातील संपूर्ण बंद करण्यात आलेली होती. यासाठी महावितरणचे अधिकारी कर्मचारी सकाळी साडेपाच पासून घटनास्थळी ठाण मांडून होते.आग वाढल्याची दिसताच घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी बाजूच्या दुकानातील सामान वस्तू हलवण्यास व्यापाऱ्यांना मदतही केली.
नगर परिषदेची आपत्कालीन यंत्रणा कुचकामी
सकाळी आग लागल्याचे समजताच नगर परिषदेचा आगीचा बंब घटनास्थळी दाखल झाला खरा. मात्र आगीचे लोळ मोठे असल्या कारणाने नगर परिषदेच्या अग्निशमन गाडीकडून ती आग आटोक्यात आणणे शक्य नव्हते. पाण्याचा एकच फवारा असल्याने आग थांबतच नव्हती. नंतर परळी थर्मल पॉवर स्टेशनच्या अग्नीशमनची गाडी आल्याने त्यांनी आग आटोक्यात आणली. नंतर पुन्हा वैद्यनाथ साखर कारखाना आणि पॉवर स्टेशनची आणखी एक गाडी घटनास्थळी दाखल झाली होती. दरम्यान त्या परिसरात खाद्य तेलाचे दुकाने होती आग वेळेतच आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला खरा पण नगर परिषदेची आपत्कालीन तोकडी यंत्रणा पुन्हा समोर आली.
summary…fire at parali main market




























































