‘फायर ऑडिट’साठी बहुमजली इमारतींची झाडाझडती, दर सहा महिन्यांनी अहवाल सादर करणे बंधनकारक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लालबाग येथील उत्तुंग ‘अविघ्न’ इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा उशिरा सुरू झाल्यामुळेच आग भडवल्याचा प्राथमिक अहवाल पालिका प्रशासनाने तयार केला आहे. त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी मुंबईतील सर्व बहुमजली इमारतींमधील फायर फायटिंग यंत्रणेची तपासणी करण्यासाठी अग्निशमन दलाकडून विशेष मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये दर सहा महिन्यांनी अग्निशमन यंत्रणा कार्यरत असल्याचा अहवाल देणे बंधनकारक राहणार असून दुर्लक्ष करणाऱया सोसायटय़ांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रमुख अग्निशमन दल अधिकारी हेमंत परब यांनी सांगितले.

करी रोड येथील ‘वन अविघ्न पार्क’ या 60 मजली इमारतीला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नसली तरी एका सुरक्षा कर्मचाऱयाचा 19 व्या मजल्यावरून खाली पडल्याने मृत्यू झाला आहे. तर अग्निशमन दलाने 26 जणांची शिडीच्या सहाय्याने सुखरूप सुटका केली. या इमारतीत 19 मजल्यावर एका फ्लॅटमध्ये आग लागली होती. यावेळी इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा सुरू होण्यास वेळ लागला. त्यामुळे विसाक्या मजल्यापर्यंत आग पसरली. आग लागलेल्या फ्लॅटमधील सर्व साहित्य जळून खाक झाले असून उष्णता आणि धुरामुळे इतर फ्लॅटचेही नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने आता उत्तुंग इमारतींमधील अग्निशमन यंत्रणा तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा असूनही कार्यान्वित नसल्याचे प्रकार दुर्घटनेनंतर समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार असून दर सहा महिन्यांनी अग्निशमन यंत्रणा सुरू असल्याचा अहवाल देणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
– हेमंत परब, अग्निशमन दल प्रमुख

‘अविघ्न’चा अहवाल आठ दिवसांत

अविघ्न इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा उशिरा सुरू झाल्याचे सांगण्यात येत असले तरी काही रहिवाशांकडून या ठिकाणी यंत्रणा ठप्प असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पालिकेने या प्रकारची गंभीर दखल घेतली असून आठ दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्यात येईल अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.