
मुंबईतील दाटीवाटीच्या वस्तीमध्येही शिरून आगीसारख्या दुर्घटनेत तातडीने पोहोचून बचाव कार्य सुरू करणाऱया हायटेक फायर बाईक पालिकेच्या अग्निशमन दलात दाखल होणार आहेत. पालिकेच्या 24 वॉर्डमधील फायर स्टेशनमध्ये प्रत्येकी एक बाईक ठेवली जाणार आहे. पालिकेचे उपमुख्य अग्निशमन दल अधिकारी राजेंद्र चौधरी यांनी ही माहिती दिली.
मुंबईची लोकवस्ती दाटीवाटीची असल्याने अनेक वेळा मोठमोठे फायर इंजिन-बंब पोहोचण्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आगीची तीव्रता वाढते. त्यामुळे अग्निशमन दलात हायटेक फायर बाईक आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे वर्दी मिळाल्यानंतरचा रिस्पॉन्स टाइम कमी होणार आहे. परिणामी दुर्घटनेच्या तीव्रतेनुसार आवश्यक यंत्रणा वेगाने उपलब्ध करणे शक्य होणार आहे. गाडीवरच दोन पाण्याच्या टाक्या असल्याने पाठीवरून टाकीतून पाणी नेण्याची गरज राहणार नाही. या एका बाईकसाठी पालिका सुमारे 13 लाख रुपये खर्च करणार आहे.
असा होणार फायदा
- आगीची माहिती मिळताच ही फायर बाईक घटनास्थळी धाव घेईल. बाईकवर अग्निशमन यंत्रणा असेल.
- 40 लिटर पाणी, पोर्टेबल फायर सिस्टीम, कम्युनिकेशन सिस्टीम, 30 मीटर होजरील पाइप, फायर पंप, फायर एक्सटिंग्युशर अशी यंत्रणा असेल.
- भडका उडालेल्या ठिकाणीच छोटय़ा प्रमाणात असताना आग विझविण्यासाठी उपयुक्त.
- आग लवकर विझविल्याने दुर्घटनेची तीव्रता कमी होणार. मोठय़ा बंबांच्या गाडय़ांपेक्षा लवकर पोहोचल्याने दुर्घटनेची तीव्रता समजणार.





























































