परिसर वर्दळमुक्त, अग्निशमन यंत्रणा, सुरक्षित वातावरण; पालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सुरक्षित शाळा’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या विद्यार्थ्यांना शाळेत सुरक्षित वातावरणात अध्ययन करता यावे यासाठी आता ‘सुरक्षित शाळा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी प्रशासनाने कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये वर्दळमुक्त शाळा परिसर, सुरक्षित वातावरण, अग्निशमन यंत्रणा, स्वसंरक्षणाचे धडे, चालणे-सायकलिंगला प्रोत्साहन असे उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये उपयोगात नसलेल्या जागेत पार्किंग सुविधा निर्माण करण्याचे विचाराधीन आहे.

पालिकेच्या शाळा आणि शाळांचा परिसर सुरक्षित करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विशेष उपक्रम हाती घेण्यात येत असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी अर्थसंकल्पात स्पष्ट केले आहे. हा कृती आराखडा तयार करताना परिसर सुरक्षित करण्याबरोबरच शाळा आणि समाजात सकारात्मक सबंध निर्माण करण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे. शाळेचा परिसर चालण्यासाठी सायकल चालविण्यासाठी योग्य असेल अशा पद्धतीने वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार आहे. पालिकेच्या 4300 विद्यार्थ्यांना कोविड काळात ऑनलाइन माध्यमातून स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना तज्ञांकडून हे प्रशिक्षण देण्यात आले आहे. कोणत्याही आपत्तीत प्रथम प्रतिसाद महत्त्वाचा असतो. शाळांमध्ये दुर्दैवाने आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपत्तीच्या वेळी पहिला प्रतिसाद देऊ शकतील. त्यासाठी शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापनाचे शिक्षण देण्यात आले आहे. पालिकेच्या तसेच खासगी अनुदानित शाळांमधील 2 हजार 398 शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले आहेत.

अग्निसुरक्षेला प्राधान्य

शाळांमधील अग्निसुरक्षा सक्षम करण्यासाठी सद्यस्थितीमधील पारंपरिक यंत्रणेच्या जागी आता अत्याधुनिक जेट कुल जेट या तंत्राचे लहान आकाराचे अग्निशामक ठेवण्यात येणार आहे. हे अग्निशामक हाताळण्यासाठी सोपे तर आहेतच त्याचबरोबर याच्या फवाऱयामुळे आगीवर नियंत्रण मिळण्या बरोबर आगीच्या ठिकाणचे तापमान एक हजार अंशांवरून 30 अंशांपर्यंत तत्काळ कमी होऊ शकते.