
अग्निशमन दलाच्या जवानांची कार्यतत्परता आणि प्रसंगावधानतेमुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोठा अनर्थ टळला. पहाटेच घरातील वायरिंगने पेट घेतल्यामुळे 21 मजली रहिवासी टॉवर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आणि 44 रहिवाशांची सुखरूप सुटका केली. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. सुदैवाने अग्निशमन दलाचा कोणताही जवान यात जखमी झाला नाही.
बोरिवली पश्चिम येथील गोराई-शिंपोली रोड येथील रोझी मेरी इमारतीच्या ‘ए’ विंगमधील 14 व्या मजल्यावरील एका फ्लॅटला पहाटे साडेपाचच्या सुमाराला आग आगली. तीन विंग असलेल्या या इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाडय़ा घटनास्थळी पोहोचल्या. जवानांनी दलाच्या शिडीचा वापर करत 14 व्या मजल्यावर पाण्याचा मारा सुरू केला. त्याचबरोबर इमारतीमधील स्प्रिंकलचाही वापर करण्यात आला.
आगीच्या ज्वाळा, धुराने धोका वाढला
इमारतीमधील 1404 या घरातील वायरिंगला आग लागल्याने घरातील इतर उपकरणे आणि सामानानेही पेट घेतला. लाकडी फर्निचर्स, दारे-खिडक्या, खिडक्यांचे पडदे, टीव्ही, सीलिंग सजावट, एसी, संगणकानेही पेट घेतला. त्यामुळे आगीबरोबरच मोठय़ा प्रमाणात धुराने इमारतीमध्ये घबराट पसरली. आगीची तीव्रता वाढून आग लेव्हल दोनवर पोहोचली.





























































