‘वस्त्रनगरी’ इचलकरंजीत सूत गोदामास भीषण आग, सात कोटींहून अधिक नुकसान; एक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इचलकरंजीतील जय सांगली नाका परिसरात असलेल्या सूत गोदामास आज पहाटे भीषण आग लागली. रौद्ररूप धारण केल्या आगीला आटोक्यात आणण्यासाठी इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ, कुरुंदवाड येथील अग्निशमन दलांना आठ तास लागले. मदतकार्यावेळी आगीच्या झळा बसून आलम मोमिन हे जखमी झाले आहेत. मध्यवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या आगीत गोदामातील सुमारे पाच हजार सुताची बाचकीसह साहित्य भस्मसात झाले. आगीच्या तीक्रतेने राशिनकर यांच्या इमारतीला तडे गेले आहेत. तसेच इमारतीमधील वातानुकूलित यंत्रणा, टीव्ही, प्रापंचिक साहित्य यांसह सुमारे सात कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

इचलकरंजीतील जय सांगली नाका-सोलगेमळा मार्गावर राजेंद्र राशिनकर यांची तीनमजली इमारत असून, लगतच राशिनकर यांच्या मालकीचे गोदाम आहे. चेतन मेहता यांना ते भाडय़ाने दिले आहे. या गोदामात सुमारे सहा हजार सुताची बाचकी होती. आज पहाटे गोदामाच्या पाठीमागून धूर येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच राशिनकर यांच्या घरी आलेल्या नातेवाईकांची भीतीने गाळण उडाली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे राशिनकर यांच्या इमारतीमधील चार गॅस सिलिंडर सुरक्षितस्थळी हलविण्यात आले, तर काहींनी गोदामातील 100हून अधिक सुताची बाचकी तातडीने
बाजूला हलविली.

दोन जेसीबीने भिंत फोडून मदतकार्य

– गोदामात ज्वलनशील कृत्रिम धाग्याचा मोठय़ा प्रमाणात साठा होता. या साठय़ाला बघता बघता आग लागली. धुरामुळे आग विझविण्यात अडचणी येत असल्याने गोदामाच्या छताचे पत्रे फोडले. तरीही आगीची तीव्रता कमी होत नसल्याने दोन जेसीबींच्या साहाय्याने गोदामाच्या भिंतीही फोडाव्या लागल्या. यावेळी महापालिकेच्या अग्निशमन दलाकडील अपुऱया यंत्रणा दिसून आल्याने अनेक नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करीत नाराजी व्यक्त केली. उशिरापर्यंत या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली नव्हती.