
राहाता तालुक्यातील साकुरी येथील इंद्रनगर परीसरातील तरटे मंडपच्या गोडाऊनला आग लागून सुमारे पाच लाखांचे साहीत्य जळून खाक झाले आहे. बडोदा बँकेच्यामागे असलेल्या तरटे मंडप डेकोरेटर यांच्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील मंडप साहित्याच्या खोलीतून सोमवारी सकाळी 9 वाजता धूर येताना दिसला. परीसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाला घटनेबाबत कळविण्यात आले. मात्र, त्यांची गाडी नादुरूस्त असल्याने शिर्डी नगरपंचायतीची गाडी आली. तोपर्यंत गोडाऊनमधील मंडप डेकोरेशन साहित्यासह साऊंड सिस्टीम आणि कापडांनी पेट घेतल्याने आगीने रौद्ररुप धारण केले होते. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर झाल्याने आग विझवण्यात अडचणी येत होत्या.
शिर्डी पंचायतीच्या गाडीने अर्धा तास परीश्रम घेत आग आटोक्यात आणली. या परीसराजवळच मोठी वसाहत आहे. आग मोठ्या प्रमाणात परसली नसल्याने दुर्घटना टळली आहे. राहातामधील अग्निशमन दलाची गाडी उपलब्ध असती तर नुकसान टळले असते असे किरण तरटे यांनी सांगीतले. शॉट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमीक अंदाज व्यक्त होत आहे.





























































