
गंजगोलाईतील गोयल ट्रेडर्सच्या इमारतीला शुक्रवारी सायंकाळी लागलेली आग अग्निशमन दल व पोलिसांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. अशा घटना पुन्हा घडू नयेत याचे निर्देश देत ही आग नेमकी कशामुळे लागली, याची सखोल चौकशी करण्याचे आदेश महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी पालिका आयुक्तांना दिले आहेत.
गंजगोलाईतील गोयल ट्रेडर्स या इमारतीला शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. चार मजली इमारत आणि परिसरातील इमारतींनाही आगीची तीव्रता जाणावत होती. आग लागल्याचे समजताच गंजगोलाईतील व्यापारी व नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
महापौर विक्रांत गोजमगुंडे यांना या प्रकाराची माहिती मिळताच ते स्वतः घटनास्थळी दाखल झाले.पालिका आयुक्त अमन मित्तल तसेच अग्निशमन दल, स्वच्छता विभाग आणि पालिकेतील प्रत्येक विभागाला तातडीने घटनास्थळी हजर होण्याचे आदेश त्यांनी दिले. पोलिसांनाही माहिती दिली. आगीची तीव्रता वाढत असतानाच महापालिकेचे अग्निशमन बंब तेथे दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले पण तरीही आग आटोक्यात येत नव्हती. हे पाहून महापौर गोजमगुंडे यांनी प्रशासनाशी संपर्क साधत उदगीर,औसा तसेच इतर ठिकाणचे बंब उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. हे बंबही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
आगीची तीव्रता प्रचंड असतानाही अग्निशमन दलाच्या जवानांनी आग अधिक पसरू नये याची काळजी घेत आगीवर नियंत्रण मिळविले. ज्या ठिकाणी आग लागली होती ती इमारत अतिशय अरुंद रस्त्यावर होती.त्यामुळे अग्निशमन दलाच्या वाहनांना इमारतीपर्यंत पोहोचताही येत नव्हते. तरीदेखील जवानांनी हार मानली नाही. यामुळेच या दुर्घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही. आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.






























































