
जवळपास दोन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेले व हजारो लोकांचा जीव घेणारे गाझातील युद्ध अखेर थांबले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेला शांतता करार इस्रायल व ‘हमास’ने मान्य केला आहे. शांतता कराराचा पहिला टप्पा आजपासून सुरू झाला आहे. त्यामुळे गाझामध्ये आनंदीआनंद पसरला असून लोकांनी रस्त्यावर उतरून सेलिब्रेशन सुरू केले आहे.
ट्रम्प यांनी बुधवारी रात्रीच सोशल मीडियातून याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यातील शांतता करारावर दोन्ही बाजूंनी स्वाक्षऱया करण्यात आल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. या करारासाठी यशस्वी मध्यस्थी केल्याबद्दल ट्रम्प यांनी कतार, तुर्की आणि इजिप्तचे आभार मानले आहेत. शांतता कराराच्या पहिल्या टप्प्याचा कालावधी सहा आठवड्यांचा आहे.
नरेंद्र मोदी यांचा ट्रम्पना फोन
इस्रायल-हमासमधील युद्धबंदीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले. मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पह्न कॉल करून यशस्वी मध्यस्थीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर अमेरिकेसोबत सुरू असलेल्या व्यापार कराराच्या वाटाघाटींबद्दलही चर्चा केली. मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांना फोन करून युद्धबंदीसाठी त्यांचे अभिनंदन केले.
पहिल्या टप्प्यात काय होणार?
पहिल्या टप्प्यात इस्रायल व हमासकडून ओलीस ठेवण्यात आलेल्या एकमेकांच्या नागरिकांची सुटका केली जाईल.
‘हमास’ जवळपास 100 इस्रायली नागरिकांना सोडेल, तर इस्रायल 1,950 पॅलेस्टिनी पैद्यांना सोडेल.
गाझातील मदत साहित्य पुरवठय़ावर लावलेली बंदी इस्रायल शिथिल करेल.
गाझामध्ये पाच मानवी सहाय्यता पेंद्रांची स्थापना केली जाईल. येथे जेवण, पाणी, औषधे व इतर आवश्यक साहित्याचा पुरेसा पुरवठा केला जाईल.
इस्रायली सैन्य 24 तासांत नागरी वस्तीतून मागे हटेल आणि करारात ठरलेल्या रेषेवर येऊन थांबेल.