
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी दिंडीने पाचव्या दिवशी शनिवारी सिन्नर तालुक्यात प्रवेश केला. मोहदरी घाट परिसरातून मार्गक्रमण करीत हा भक्तिसागर लोणारवाडीत मुक्कामी होता. उद्या रविवारी दातली येथे दिंडीचे पहिले गोल रिंगण होणार आहे.
परंपरेनुसार त्र्यंबकेश्वर येथून निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी रथासह दिंडी पंढरपूरकडे मंगळवारी मार्गस्थ झाली. शुक्रवारी पळसे येथे मुक्कामी थांबलेला हा भक्तिसागर शनिवारी पाचव्या दिवशी पहाटे काकडा आरती होताच सिन्नरच्या दिशेने चालू लागला. मोहदरी घाटातून त्यांनी मार्गक्रमण केले. हा घाट परिसर टाळ-मृदंगाचा गजर, संत-हरिनामाच्या जयघोषाने भक्तिरसात न्हाऊन निघाला. या भागात काही वेळ विसावा घेतल्यानंतर दिंडी पास्ते गावी पोहोचली. भोजन व थोडय़ा विश्रांतीनंतर त्यांनी मुक्कामाचे ठिकाण असलेल्या लोणारवाडीची वाट धरली. सायंकाळी ते या पालखीतळावर दाखल झाले.
ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत करून भाविकांनी नाथांच्या दर्शनाचा लाभ घेतला. उद्या रविवारी सकाळी दिंडी सिन्नर शहरात पोहोचेल. दुपारी कुंदेवाडीत भोजन आणि त्यानंतर दातलीत पहिला गोल रिंगण सोहळा रंगणार आहे. शनिवारी निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्तांनी दातली येथे रिंगण सोहळ्याच्या जागेची पाहणी करून तयारीची माहिती घेतली.
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या त्र्यंबकेश्वरच्या संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी दिंडीने शनिवारी सिन्नर तालुक्यात प्रवेश केला. या भक्तिसागराने विठ्ठलनामाचा जयघोष करीत मोहदरी घाटातून मार्गक्रमण केले.