पहिल्या ‘वृक्ष संमेलना’ला थाटात सुरूवात, बीड जिल्ह्याने अनुभवला आगळा वेगळा नजारा

1405

झाडे लावली, झाडे जगवली तर पाऊस पडेल, पाऊस पडला तर दुष्काळाचा कलंक धुऊन निघेल असा संदेश देत बीडमध्ये आज मोठ्या दिमाखात देशातील पहिल्या वृक्ष संमेलनाचे उद्घाटन झाले. बीड शहराजवळील पालवणजवळ सह्याद्री देवराई येथे आयोजित वृक्ष संमेलनाच्या अध्यक्षस्थानी वडाचे झाड होते. अभिनेते सयाजी शिंदे यांनी ‘मी वड बोलतोय’ म्हणत भविष्याचा धोका ओळखा, वृक्षाचे संगोपन करा असे आवाहन केले. ही उभारलेली चळवळ राज्यभर पुढे नेणार असा आशवाद सयाजी शिंदे यांनी दिला.

बीड येथील पालवण जवळील देवराई प्रकल्पामध्ये आज देशातील पहिल्या वृक्ष संमेलनाचे उद्घाटन मोठ्या दिमाखात झाले. जिल्हाभरातून नव्हे तर राज्यभरातून पर्यावरण प्रेमी या संमेलनासाठी बीडमध्ये दाखल झाले होते. जिल्ह्यातील बहुतांश शाळेतील विद्यार्थी, शहरातील पालक, विविध क्षेत्रातील मान्यवर वृक्ष संमेलनाचे साक्षीदार झाले होते. वृक्ष सुंदरी स्पर्धेमध्ये शेकडो मुलींचा सहभाग अनोख्या पद्धतीने पार पडला. या कार्यक्रमाला अभिनेते सयाजी शिंदेसह लेखक अरविंद जगताप, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आमदार संदीप क्षीरसागर, सी.ओ.अजित कुंभार, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, वनअधिकारी सातपुते, माजी आमदार उषाताई दराडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

first-tree-summit-3

बुधवारी वृक्ष दिंडीने या संमेलनाची खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. गुरुवारी या संमेलनाला सुरूवात झाली. सयाजी शिंदे यांनी शेकडो एकर डोंगरमाथ्यावर लाखो झाडे लाऊन या परिसराचे चेहरा मोहरा बदलला. आज त्याच परिसरामध्ये वृक्ष संमेलन घेण्यात आले. त्यासाठी देवराई नवरीसारखी नटली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडाचे झाड होते तर उद्घाटनपर अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले. मी वड बोलतोय म्हणत त्यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली.

first-tree-summit

‘माझा म्हणजे वडाचा झाडाचा जन्म 1857 चा आहे. माझ्या आजोबाचा जन्म त्यापूर्वीचा आहे. आमचे पूर्वज खूप जुने आहेत. वनस्पतीमध्ये सर्वात जास्त ऑक्सिजन देणारे आम्ही आहोत. जेव्हा जीव गुदमरतो तेव्हा ऑक्सिजनचे महत्व कळते. वडाचे झाड हे सर्वात जास्त श्रीमंत झाड आहे. भविष्यातील पर्यावरणाचा धोका ओळखा , आपला परिसर, आपले शहर, आपले गाव, आपले राज्य, आपला देश हिरवागार झाला पाहिजे. त्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा असे आवाहन मी करत आहे’, असे आपल्या भाषणात सयाजी शिंदे म्हणाले.

first-tree-summit-2

सकाळपासूनच लगबग
बीडमध्ये होणाऱ्या या अनोख्या वृक्ष संमेलनासाठी शहरातील शाळा, महाविद्यालये आणि घराघरातून प्रत्येकजण जाण्यासाठी धडपडत होता. शहरापासून 8 ते 10 कि.मी.अंतरावर असणाऱ्या देवराई प्रकल्पाभोवती तब्बल दोन लाख झाडे लावण्यात आली आहेत. या वृक्ष लागवडीचे सर्व श्रेय सयाजी शिंदे यांना जाते. आज वृक्ष संमेलन घेण्यात आले. समोर हजारो नागरिक उपस्थित होते. व्यासपीठावर वडाचे झाड अध्यक्षस्थानी होते. तर त्याभोवती प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती. आगळा वेगळा नजारा आज बीड जिल्ह्याने अनुभवला.

आपली प्रतिक्रिया द्या