
सध्या नवरात्र सुरू असल्याने देवीची आराधना मनोभावे सुरू आहे. अनेकांनी उपवासही धरले आहेत. धार्मिक उत्सवामुळे मासे खाणाऱ्या खवय्यांची संख्या घसरली असून बाजारपेठेत दरही गडगडले आहेत. करंजा बंदरात आवक वाढली, पण मासळीला उठावच नाही. नवरात्रीनंतर पुन्हा खवय्ये माशांवर ताव मारणार असल्याने सध्या तरी मासे विक्रेत्यांना ग्राहकांची वाट पाहावी लागणार आहे.
पावसाळ्यात ६० दिवस मासेमारी बंद होती. त्यानंतर १ ऑगस्टपासून पुन्हा हंगाम सुरू झाला. मात्र खराब हवामान, विविध वादळांमुळे हवामान विभागाने सातवेळा धोक्याचा इशारा दिला. किमान २०-२२ दिवस मासेमारी बंद ठेवावी लागली होती. यादरम्यान मासळीची आवक कमी झाल्याने भाव गगनाला भिडले होते.
आता महिनाभरापासून मासेमारीला जोरदार सुरुवात झाली असून करंजा बंदरात मासळीची आवकही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पण सोमवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाल्याने खवय्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. यामुळे मासळीला उठाव नसल्याने भाव घसरले असल्याची माहिती करंजा मच्छीमार संस्थेचे माजी उपाध्यक्ष व मासळी व्यावसायिक रमेश नाखवा यांनी दिली.
मच्छीमारांना फटका
बाजारात मासळीला उठाव नाही याचा मच्छीमारांना चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे बाजारात विक्रीतून मिळणाऱ्या जास्त भावापेक्षा कमी भावाने पॅकिंग कंपन्यांना मासळी विकण्याची वेळ येथील मच्छीमारांवर येऊन ठेपली आहे. मात्र नवरात्रोत्सवानंतर भाव पूर्वपदावर येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. मात्र तोपर्यंत ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.