रत्नागिरीतील पर्ससीन ट्रॉलर मालवण समुद्रात पकडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मालवण

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून मासेमारी करणार्‍या रत्नागिरीतील एक पर्ससीन ट्रॉलर शनिवारी सायंकाळी देवगड येथील मत्स्यव्यवसायच्या अधिकार्‍यांनी गस्तीनौकेचा आधार घेत पकडला. कारवाईसाठी रात्री उशिरा हा ट्रॉलर मालवण बंदरात आणण्याची कार्यवाही सुरू होती. जिल्ह्याच्या सागरी हद्दीत परराज्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील पर्ससीन ट्रॉलर्सची घुसखोरी होत आहे. शिवसेना शहर प्रमुख मच्छीमार नेते बाबी जोगी यांनी हे ट्रॉलर्स मत्स्य व्यवसाय विभागाने पकडावेत अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा दिल्यानंतर मत्स्य विभागाने ही कारवाई केली.

सिंधुदुर्ग किल्ल्यानजीकच्या समुद्रात सकाळीच परराज्यातील हायस्पीड, पर्ससीन ट्रॉलर्सनी घुसखोरी करत मासळीची लूट करण्यास सुरवात केली. मत्स्य हंगाम सुरू झाल्यानंतर परराज्यातील ट्रॉलर्सचे अतिक्रमण सुरूच असल्याने पारंपरिक मच्छीमारांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. घुसखोरी रोखण्यासाठी सरकारने मत्स्यव्यवसाय विभागास आदेश दिले असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. मत्स्यव्यवसाय विभागाची गस्तीनौका लवकरच दाखल होईल असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात ती अद्याप दाखल न झाल्याने पर्ससीनच्या घुसखोरी विरोधात आता मच्छीमार अधिक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

गेल्या दोन आठवड्यात शनिवार, रविवार या दोन दिवशीच परराज्यातील व परप्रांतीय हायस्पीड, पर्ससीनचे ट्रॉलर्स जिल्ह्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून मासळीची लूट करत असल्याचे दिसून येत आहे. पर्ससीननेट मासेमारी हंगाम सुरू झाल्यानंतर त्यांच्याकडून जिल्ह्याच्या सागरी हद्दीत होणारी घुसखोरी रोखण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात मत्स्य व्यवसाय विभागाने गस्तीनौका घेत त्यावरून गस्त घालण्याचे निश्‍चित केले होते. मात्र या गस्तीनौकेचा वेग परराज्यातील हायस्पीड, पर्ससीन ट्रॉलर्सचा वेग पाहता फारच कमी असल्याने घुसखोरी रोखण्यास ती अपयशी ठरली आहे. मत्स्य व्यवसाय विभागाची गस्तीनौका सात ते आठ दिवसात दाखल होईल असे स्पष्ट केले होते. मात्र बराच कालावधी उलटूनही मत्स्य व्यवसायची गस्तीनौका दाखल झालेली नाही. त्यामुळे परराज्यातील ट्रॉलर्सची घुसखोरी वाढतच आहे. गेल्या काही दिवसात स्थानिक रापणकर संघांना मासळीची चांगली कॅच मिळत आहे. याची माहिती मिळाल्यानेच परराज्यातील ट्रॉलर्स जिल्ह्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी करत आहेत.