उरणच्या मच्छिमारांवर संकट; खर्चही निघत नसल्याने कर्ज वाढले

392

महाराष्ट्रात सर्वाधिक मच्छिमारांची संख्या असलेल्या उरण तालुक्यातील मच्छिमारांवर सध्या अर्थिक संकट ओढवले आहे. 1 ऑगस्टला मच्छिमारी हंगाम सुरू झाल्यापासून खराब हवामान आणि चक्रीवादळांमुळे मच्छिमारांचा हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे येथील मच्छिमार आर्थिक संकटात सापडला आहे.

उरण तालुक्याला मोठा सागरी किनारा लाभला आहे. त्या अनुषंगाने उरण तालुक्यात करंजा, मोरा, दिघोडे, खोपटे, आवरे, गोवठणे, हनुमान कोळीवाडा, घारापुरी समुद्रकिनाऱ्यांच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मच्छिमारीचा व्यवसाय केला जातो. एकट्या करंजा गावात सुमारे 1100 यांत्रिक नौका असून हजारो कुटूंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर चालतो. मात्र, यावर्षी मासेमारीचा हंगाम सुरू झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे मच्छिमारीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे मच्छिमारांना खोल समुद्रात मच्छिमारी न करताच परतावे लागले आहे. याचा परिणाम त्यांच्या उत्पन्नावर झाला आहे. ट्रॉलर किंवा पर्सोनेट नौकेला मच्छिमारीला जाताना साधारणपणे 2 लाख रूपये खर्च येतो. डिझेल, बर्फ, खलाशांची मजूरी आणि त्यांचा जेवण-खाण्याचा खर्च अशा प्रकारचा साधारण खर्च असतो. मात्र, मच्छिमारीचा हंगाम सूरू झाल्यापासून मच्छिमारांच्या नौका वादळ आणि खराब हवामान यामुळे अनेकदा परत आल्या आहेत. त्यामुळे त्यांचा झालेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे सध्या प्रत्येक नौका मालकांवर 10 ते 12 लाखाचे कर्ज झाले आहे. त्यातच गेल्या वर्षभरापासून शासनाने या मच्छिमारांना डिझेलचा परतावाही दिला नसल्याने मच्छिमार मोठ्या अर्थिक अडचणीत सापडले आहेत. मच्छिमार अडचणीत सापडल्यामुळे त्या व्यवसायावर आधारीत खलाशी, मासळी विक्रेते, टेम्पोचालक, जाळी व साहित्य विक्री करणाऱ्यांचे व्यवसायही अडचणीत आले आहेत.

उरण तालुक्यात मच्छिमारांसाठी लॅण्डींग पॉईंट चांगला असल्यामुळे आणि मुंबईसारखी बाजारपेठ जवळ असल्यामुळे व्यवसाय चांगला फोफावला आहे. मात्र या हंगामात सतत येणारी वादळे आणि खराब हवामान यामुळे मत्स्य उत्पादनात घट झाली आहे. मासेमारीसाठी येणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नसल्याने नफा सोडून द्या पण खर्च पण निघत नाही. यामुळे सध्या येथील मच्छिमारांवर या तीन महिन्यात 10 ते 12 लाखांचे कर्ज झाले आहे. त्यामुळे मच्छिमार अडचणीत आला आहे. अडचणीत सापडलेल्या मच्छिमारांसाठी शासनाने मत्स्य दुष्काळ जाहीर करून अर्थिक मदत करावी, अशी मागणी करंजा मच्छिमार सोसायटीचे चेअरमन भालचंद्र कोळी यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या