मच्छीमारांनाही नुकसान भरपाई द्या, अलिबाग तालुक्यातील कोळी बांधवांनी शासनाचा ठोठावला दरवाजा

1115

मच्छीमारी व्यवसाय 1 ऑगस्ट पासून सुरू झाला तरी पावसाने आणि चक्रीवादळाने मच्छीमार बांधवावर उपासमारीची वेळ आली आहे. मच्छीमारांची आर्थिक कोंडी झाली असताना शासनाकडून कोणताही पंचनामे वा नुकसान भरपाईसाठी पावले उचललेली नाहीत. अलिबाग तालुक्यातील कोळी बांधवांनी शासनाने मच्छी दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई देण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, तहसीलदार सचिन शेजाळ, मत्स्य आयुक्त अभयसिंग इनामदार तसेच मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे. लवकरात लवकर कोळी बांधवांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या निवेदनामार्फत शासनाला केली आहे.

पावसाळ्यानंतर 1 ऑगस्टपासून मच्छीमारी व्यवसाय करण्यास शासनाने परवानगी कोळी बांधवांना देण्यात आली. त्यानुसार कोळी बांधवांनी आपल्या मच्छीमार बोटी समुद्रात मच्छीमारीसाठी पाठविल्या. मात्र नैसर्गिक पावसाच्या आपत्तीने मच्छीमारी बांधवांना मच्छी व्यवसाय करताना अडचणी येऊ लागल्या. पावसाळा संपला तरी अवेळी पडत असलेला पाऊस, क्वार आणि महा चक्रीवादळ यामुळे कोळी बंधावचा व्यवसाय ठप्प झाला आहे. चक्रीवादळ झाले असल्याने समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे मच्छीमारी बोटी बंद आहेत. तसेच माशांचा दुष्काळ असल्याने मच्छीही मिळणे कठीण झाले आहे.

मोठमोठ्या मच्छीमारासोबत हातावर मच्छीचा व्यवसाय करणाऱ्या छोट्या मच्छीमार मच्छी मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्यामुळे कुटुंबाचा चरितार्थ चालविताना तसेच मुलाच्या शिक्षणाचा खर्च करणेही परवडत नाही. तर मच्छीमार बोटीवर लागणार डिझेल खर्च, कर्मचाऱ्याचा खर्चही छोट्या मोठ्या मच्छीमार बोट मालकांना सहन करावा लागत आहे.

शेतकऱ्याच्या भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे शासनाकडून सुरू झाले आहेत. मात्र कोळी बांधवाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. या सर्व परिस्थितीचा शासनाने विचार करून कोळी बांधवानाही नुकसान भरपाई द्यावी यासाठी अलिबाग तालुक्यातील कोळी बांधवांनी शासनाचा दरवाजा ठोठावला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या