
कुणाचे नशीब कसे पालटेल काही सांगता येत नाही. ओडिशातील दिघामध्ये काही मच्छीमार एका रात्रीत कोटय़धीश झाले आहेत. या मच्छीमारांच्या जाळ्यात 121 ‘तेलिया भोला’ नावाचे मासे अडकले. या माशांची किंमत अंदाजे 2 कोटी रुपये आहे. या प्रत्येक माशाचे वजन 18 किलो किंवा त्याहून अधिक आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात किमती मासे सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
गेल्या वर्षीही मच्छीमारांना दिघा किनाऱयावरून तेलिया भोला मासा सापडला होता, मात्र त्यांची संख्या तेव्हा 30 होती. त्या वेळी त्यांना त्या माशाचे एक कोटी रुपये मिळाले होते. यावेळेला जास्त प्रमाणात मासे आढळले आहेत.
व्यापाऱयांच्या म्हणण्यानुसार, या प्रजातीचा मासा खोल समुद्रात आढळतो. माशांच्या किंमती जास्त असल्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रात मच्छीमार मासे पकडण्यासाठी जातात. या विशिष्ट प्रकारच्या माशाची किंमत साधारणतः 13 हजार रुपये प्रतिकिलो आहे. या माशांच्या पोटात अनेक फायदेशीर घटक आहेत. त्यामुळे औषध कंपन्यांकडून माशांना मोठी मागणी असते. त्यामुळे माशांच्या किमती चढय़ा आाहेत.



























































